मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2026-27 या देशांतर्गत क्रिकेट हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले असून 23 ऑगस्टपासून नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात एकूण 1788 सामने खेळवले जाणार असून दिलीप ट्रॉफीने स्पर्धेचा श्रीगणेशा होईल. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील स्पर्धांचे विस्तृत नियोजन करण्यात आले आहे.
दिलीप ट्रॉफीनंतर 1 ऑक्टोबरपासून प्रतिष्ठेचा इराणी कप रंगणार आहे. या सामन्यात मागील रणजी ट्रॉफी विजेता जम्मू-काश्मीर संघ ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाशी दोन हात करणार आहे. जम्मू-काश्मीरने गेल्या हंगामात इतिहास रचत पहिले रणजी विजेतेपद पटकावले होते.

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठेची रणजी ट्रॉफी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मागील हंगामाप्रमाणे यावेळीही स्पर्धा दोन टप्प्यांत खेळवली जाणार आहे. पहिला टप्पा ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये तर दुसरा टप्पा जानेवारी-फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडेल. स्पर्धेत 32 संघांचा एलिट गट आणि 6 संघांचा प्लेट गट असे स्वरूप कायम ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि विजय हजारे एकदिवसीय स्पर्धादेखील या हंगामात रंगणार आहेत. मागील हंगामात ईशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने पहिल्यांदाच सैयद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकत इतिहास घडवला होता.
महिला क्रिकेट हंगामाची सुरुवात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सीनियर महिला टी-20 ट्रॉफीने होणार आहे. त्यानंतर डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान इंटर-झोनल आणि एकदिवसीय स्पर्धा खेळवल्या जातील. तसेच अंडर-एज स्पर्धाही नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत पार पडतील. महाराष्ट्र महिला संघाने मागील सीनियर महिला टी-20 ट्रॉफी जिंकून आपली ताकद सिद्ध केली होती.
यंदाच्या हंगामात बीसीसीआयने एक नवा उपक्रमही सुरू केला आहे. सीके नायडू ट्रॉफी विजेत्या संघाला ‘रेस्ट ऑफ इंडिया’विरुद्ध खेळण्याची संधी मिळणार आहे. यामुळे अंडर-23 स्तरावरील युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
तसेच पुरुष अंडर-23 स्टेट ए ट्रॉफी आणि विद्यापीठीय स्तरावरील विज्जी ट्रॉफी आता एकदिवसीय स्वरूपाऐवजी टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बदलत्या क्रिकेट शैलीनुसार युवा खेळाडूंना अधिक संधी मिळाव्यात, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
हवामानाचा विचार करून काही स्पर्धांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. अंडर-19 कूच बिहार ट्रॉफीच्या एलिट गटातील सर्व सामने जानेवारी महिन्यात बंगळुरू आणि म्हैसूर येथे खेळवले जाणार आहेत. तसेच अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफी नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत हलवण्यात आली आहे. एकूणच, 2026-27 चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम अधिक स्पर्धात्मक, व्यापक आणि युवा खेळाडूंना संधी देणारा ठरणार असल्याचे चित्र आहे.



