Home क्रीडा किनगावची दिशा पाटील हिची BSF मध्ये निवड ; बॉक्सिंगच्या जोरावर देशसेवेच्या वाटेवर...

किनगावची दिशा पाटील हिची BSF मध्ये निवड ; बॉक्सिंगच्या जोरावर देशसेवेच्या वाटेवर यशस्वी झेप

0
13


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील कन्या कु. दिशा विजय पाटील हिने क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारताच्या गौरवशाली सीमा सुरक्षा दलात (BSF) क्रीडा कोटा अंतर्गत निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे किनगाव गावासह संपूर्ण यावल तालुक्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कु. दिशा पाटील हिची बॉक्सिंग या क्रीडा प्रकारातील (57-60 Kg Female) उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. तिला दिल्ली येथे येत्या सोमवारी सेवेत रुजू होण्यासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. एका छोट्याशा गावातून सुरू झालेला तिचा प्रवास आता देशाच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारण्यापर्यंत पोहोचला आहे.

दिशाने कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामागे गावातील संस्कार, आई-वडिलांचे मार्गदर्शन, कुटुंबाचा पाठिंबा आणि स्वतःची जिद्द यांचा मोठा वाटा आहे. बॉक्सिंग क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी घेतलेले कष्ट आणि दिलेले प्रोत्साहन याचे हे फलित असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. दिशा पाटील हिच्या यशामुळे किनगावची शान वाढली असून यावल तालुक्याचा गौरव झाला आहे. गावकऱ्यांनी तिच्या या कामगिरीचे कौतुक करत तिला देशसेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा क्षेत्रातून देशसेवेपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

परिस्थिती कोणतीही असली तरी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठे ध्येय साध्य करता येते, हे दिशा पाटील हिने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. खेळाच्या मैदानातून देशसेवेच्या रणांगणापर्यंत पोहोचलेली तिची ही वाटचाल खरोखरच अभिमानास्पद मानली जात आहे. दिशा पाटील हिच्या या लक्षवेधी यशामुळे खान्देशच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या निवडीमुळे परिसरातील युवा खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून क्रीडा क्षेत्रातून उज्ज्वल भविष्य घडविण्याचा विश्वास निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound