Home प्रशासन नगरपालिका वरणगाव नगरपरिषदेवर शिवसेनेचा धडक मोर्चा ; नगराध्यक्ष सुनील काळे यांना घेराव 

वरणगाव नगरपरिषदेवर शिवसेनेचा धडक मोर्चा ; नगराध्यक्ष सुनील काळे यांना घेराव 

0
9


वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगरपरिषदेवर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नागरिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेकडो नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोर्चेकऱ्यांनी थेट नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या दालनात जाऊन त्यांना घेराव घालत नागरिकांच्या समस्यांबाबत जाब विचारला.

वरणगाव शहरातील विविध प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. नगरपरिषदेची निवडणूक होऊन सहा महिने उलटले असतानाही नागरिकांच्या मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत, असा संताप यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला. विशेषतः सिद्धेश्वर नगर परिसरातील अतिक्रमणधारकांना त्यांच्या नावावर जागा उपलब्ध करून देऊन त्यांना घरकुलांचा लाभ मिळवून द्यावा, अशी प्रमुख मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.

मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी विविध घोषणाबाजी करत नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधले. परिसरातील नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, तसेच अतिक्रमणधारकांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चा थेट नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर आंदोलकांनी नगराध्यक्षांना घेराव घालत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांनी प्रशासनाला सात दिवसांची मुदत देत मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. अतिक्रमणधारकांच्या प्रश्नावर तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. या आंदोलनावेळी कामगार नेते मिलिंद मेढे तसेच नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा देत प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.


Protected Content

Play sound