Home प्रशासन मुक्ताईनगरमध्ये एसआयआर प्रशिक्षण कार्यशाळा ; १४२ बीएलओंना सखोल मार्गदर्शन

मुक्ताईनगरमध्ये एसआयआर प्रशिक्षण कार्यशाळा ; १४२ बीएलओंना सखोल मार्गदर्शन

0
10


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाअंतर्गत बीएलओंसाठी महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ज्ञानेश्वर सभागृह, एस. एम. कॉलेज येथे पार पडलेल्या या कार्यशाळेत तालुक्यातील १४२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आणि १४ BLO पर्यवेक्षकांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रशिक्षण कार्यशाळेस मतदार नोंदणी अधिकारी तथा २० मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. त्यांनी बीएलओंना मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी काटेकोरपणे काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गिरीश वखारे, नायब तहसीलदार (निवडणूक शाखा) प्रदीप झांबरे तसेच गटशिक्षणाधिकारी वसंत मोरे यांची उपस्थिती होती. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मास्टर ट्रेनर अतुल रघुनाथ लोढे यांनी बीएलओंना सखोल प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणादरम्यान मतदारयादी अद्ययावतीकरण, घरभेटीद्वारे माहिती संकलन, नवमतदार नोंदणी, मृत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. मतदार यादीतील त्रुटी दूर करून अचूक यादी तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला. या मोहिमेअंतर्गत २० जून २०२६ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत कामकाज सात टप्प्यांमध्ये राबविले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात घरभेटी व माहिती संकलन, त्यानंतर मसुदा मतदार यादी तयार करणे, छायाचित्र अद्ययावत करणे, हरकती व सूचना स्वीकारणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे या टप्प्यांचा समावेश आहे.

अधिकाऱ्यांनी बीएलओंना मतदारांशी समन्वय साधून १०० टक्के अचूक माहिती संकलित करण्याचे आवाहन केले. मतदार यादी अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि अद्ययावत करण्यासाठी ही विशेष मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान सर्व बीएलओंना निवडणूक आयोगाकडून प्राप्त किट आणि २०० ईएफ (Enumeration Form) वाटप करण्यात आले. तसेच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोहिमेचे उद्दिष्ट, कार्यपद्धती आणि जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत तालुक्यातील नोडल अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला. निवडणूक शाखेतील महसूल सहाय्यक गौरव पाटील, डेटा ऑपरेटर विक्रम वानखेडे आणि जनगणना ऑपरेटर सिद्धार्थ बोदडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.


Protected Content

Play sound