


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगाव येथे गणेशोत्सवानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, सर्जनशीलतेला आणि बौद्धिक क्षमतेला वाव देण्यात आला. पारंपरिक गणेशोत्सव, संस्कृती आणि परंपरांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गणेशोत्सवाच्या कालावधीत दि. १५ सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा, १६ सप्टेंबर रोजी प्रश्नमंजुषा, १७ सप्टेंबर रोजी क्ले मॉडेलिंग अर्थात माती शिल्पकला आणि १८ सप्टेंबर रोजी पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांसाठी पारंपरिक गणेशोत्सव आणि विविध सांस्कृतिक विषयांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले होते. रांगोळी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी गणेशोत्सव, भारतीय संस्कृती आणि सामाजिक संदेश यांसह विविध विषयांवर आकर्षक रांगोळ्या साकारल्या. रंगांची योग्य सांगड, कल्पक मांडणी आणि विषयाची प्रभावी मांडणी यामुळे विद्यार्थ्यांच्या कलात्मक कौशल्याचे दर्शन घडले. क्ले मॉडेलिंग स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मातीच्या माध्यमातून विविध आकर्षक शिल्पे तयार केली. उपलब्ध साधनांचा कल्पक वापर करत विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेचा प्रत्यय दिला. पारंपरिक कलेशी विद्यार्थ्यांची नाळ जोडण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा विशेष ठरली.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देत आपल्या सामान्यज्ञानासह बौद्धिक क्षमतेचे प्रदर्शन केले. स्पर्धात्मक वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला, तर पोस्टर मेकिंग स्पर्धेत विविध सामाजिक व सांस्कृतिक संदेश प्रभावीपणे मांडण्यात आले. विद्यार्थ्यांनी आकर्षक पोस्टरच्या माध्यमातून आपली कल्पकता आणि संदेश देण्याची क्षमता दाखवून दिली. या विविध स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना केवळ कला आणि ज्ञान सादर करण्याची संधी मिळाली नाही, तर त्यांच्यात आत्मविश्वास, संघभावना, नेतृत्वगुण आणि कलात्मक अभिव्यक्ती विकसित होण्यासही प्रोत्साहन मिळाले. महाविद्यालयीन शिक्षणासोबतच सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्न या उपक्रमातून दिसून आला.
दि. १९ सप्टेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. विजेत्यांचा गौरव केल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला असून, इतर विद्यार्थ्यांनाही भविष्यातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रेरणा मिळाली. या स्पर्धांचे आयोजन प्रा. अश्विनी माणकर यांच्या नेतृत्वाखाली सहप्रा. स्नेहल जांभुळकर, सहप्रा. दिवायना, सहप्रा. मंजिरी मडावी, सहप्रा. प्राजक्ता सावकार, सहप्रा. सुरज खवाटे आणि सहप्रा. सुमित भारंबे यांनी केले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या डॉ. विशाखा गणवीर तसेच अध्यापकवृंदाने विद्यार्थी आणि आयोजकांचे अभिनंदन केले.



