Home क्राईम जळगावात खाजगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिला व नवजात बाळाचा मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा...

जळगावात खाजगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिला व नवजात बाळाचा मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा नातेवाईकांचा गंभीर आरोप

0
10


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका महिला आणि तिच्या नवजात बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी व धक्कादायक घटना समोर आली आहे. बऱ्हाणपूर येथून प्रसूतीसाठी जळगावात आणलेल्या योगिता पासी असे मृत पावलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. डॉक्टरांनी उपचारात गंभीर हलगर्जीपणा केल्यामुळेच बहिणीचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा संतप्त आरोप मयत महिलेच्या भावाने केला असून, या घटनेनंतर रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा गोंधळ घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, बऱ्हाणपूर येथील रहिवासी असलेल्या योगिता पासी यांना प्रसूतीसाठी जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान महिला आणि तिचे बाळ या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. मयत महिलेचे भाऊ आकाश पासी यांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप करताना सांगितले की, आपल्या बहिणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती आणि तिला तातडीने डायलिसिसची आवश्यकता होती. मात्र डॉक्टरांनी वेळेवर डायलिसिस न केल्यामुळेच बहिणीचा नाहक बळी गेला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयात एकत्र येत डॉक्टरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने रुग्णालयात धाव घेऊन मध्यस्थी केली, त्यानंतर परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली.

दुसरीकडे, रुग्णालयाचे डॉ. हरण केळकर यांनी नातेवाईकांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. डॉक्टरांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, उपचारात कोणतीही हलगर्जीपणा झालेली नाही. योगिता यांची प्रकृती उपचारापूर्वीच अत्यंत चिंताजनक होती आणि त्यात अनेक वैद्यकीय गुंतागुंत (Complications) होती, याची पूर्वकल्पना त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय उपचारांआधीच देण्यात आली होती. प्रसूतीदरम्यान अचानक महिलेच्या हृदयाची गती मंदावली, तर बाळाचे हृदयही अचानक बंद पडले. तसेच शस्त्रक्रियेपूर्वी (ऑपरेशन) महिलेला डायलिसिसची कोणतीही गरज नव्हती. उलट डॉक्टरांच्या स्पष्ट सल्ल्याविरुद्ध जाऊन नातेवाईकांनी रुग्णाला मध्यंतरी घरी नेले होते, असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound