यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या राज्यभरात शेतकरी व जनते मध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड रोष असून केळी पीक विमा, कापसाचे पडलेले दर,शेती साहित्याची चोरी, शेत रस्ते अभावी शेतकऱ्यांचे होत असलेले हाल अश्या अनेक अडचणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरूवारी ३० नोव्हेंबर गुरुवार रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते ट्रॅक्टर व बैलगाडी सह सहभागी होणार असल्याची माहिती यावल चे माजी नगराध्यक्ष तथा रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. जयंत पाटील, माजी मंत्री तथा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी,माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी पालकमंत्री सतिष आणा पाटील, भुसावळ चे माजी आमदार संतोष चौधरी, अरुण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांचे नेतृत्वात गुरूवारी ३o नोव्हेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सह जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने जळगाव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करावा, कापसाला प्रती क्विंटल १२ हजार रूपये हमीभाव मिळावा या सह शेतकरी बांधवांची वारंवार शेत शिवारातुन होणारी शेती साहित्याची चोरी थांबवावी, यावल तालुक्यासह परिसरात मोठया प्रमाणे सर्रासपणे विक्री होणारी पन्नी दारू बंद व्हावी व कायदा सुव्यवस्था सुरळीत व्हावी अशा विविध मागण्या करण्यात येणार आहेत. या मोर्चात रावेर लोकसभा क्षेत्रातून हजारो शेतकरी व कार्यकर्ते ट्रॅक्टर व बैलगाडी सह सहभागी होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार असल्याची माहिती यावल चे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी दिली.