महिलांना मिळणार रोजगार आणि आत्मसन्मान, हुसेनाबाई बहोरा केंद्राचे सोमवारी लोकार्पण !

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । येथील जारगाव परिसरात बांधलेल्या  हुसेनाबाई बहोरा महिला उत्थान केंद्राचे सोमवारी, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता लोकार्पण होत आहे. या केंद्रामुळे रोजगार आणि आत्मसन्मानाचा परीसस्पर्ष येथील कष्टकरी महिलांच्या जीवनाला होणार असल्याचे केंद्र समन्वयक हेमराज राणे आणि विनोद सोनार यांनी सांगितले.

पद्मश्री नीलिमा मिश्रा यांनी स्थापन केलेल्या भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन, या संस्थेने स्नेहालय संस्थेच्या सहायोगातून  या केंद्राची उभारणी केली असल्याचे प्रकल्पाचे मार्गदर्शक अजित मंडलिक , स्नेहालय परिवाराचे राजीव भाई गुजर ,संजय गुगळे,ॲड.श्याम आसावा,संतोष धर्माधिकारी , अनिल गावडे यांनी नमूद केले.

यावेळी पाचोरा – भडगावचे आमदार मा.किशोर आप्पा पाटील, निर्मल उद्योग गृपच्या वैशालीताई सूर्यवंशी, पाचोरा येथील  डॉ.अनिल झवर, जारगावचे सरपंच सुनिल युवराज पाटील आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

खानदेशातील पाचोरा तालुका ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने प्रगत आहे. परंतु रोजगाराच्या मर्यादित संधी, निसर्गाची अवकृपा यांमुळे येथील शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे जीवन मात्र कायमच संघर्षमय आहे.

पाचोरा गावात शिक्षण आणि बालपण गेलेल्या शब्बीरभाई बहोरा यांना या वास्तवाने अस्वस्थ केले.  अमेरिकेतील  नामांकित चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या  शब्बीरभाई यांना आपल्या भारत देशासाठी, त्यातही पाचोरा तालुक्यासाठी काही ठोस काम करण्याची तीव्र इच्छा होती.

येथील महिलांना रोजगाराचे नवे तंत्र आणि मंत्र शिकवले तर गरीब – कष्टकरी परिवार सुखाचे दोन घास नक्कीच खाऊ शकतील. महिलांना त्यांचे आरोग्य  राखता येईल. घरातील मुलांचे शिक्षण नीटपणे होईल. कुटुंब कर्जमुक्त होतील,असा व्यापक सामाजिक विचार शब्बीरभाई यांनी केला.

शब्बीरभाई यांनी केअरिंग फ्रेंड्स उपक्रमाचे संस्थापक रमेशभाई कचोलीया यांच्याशी या संकल्पाबद्दल संवाद केला.रमेशभाई यांनी त्यांचा भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन आणि स्नेहालय या सामाजिक संस्थांशी संपर्क आणि संवाद करून दिला. शब्बीरभाईंच्या आर्थिक सहयोगातून त्यांच्या मातोश्री पै.हुसेनाबाई बहोरा महिला उत्थान केंद्र पाचोरा येथे  सुरू होत आहे. या केंद्रामुळे सध्या 60 तर भविष्यात 300 महिलांना रोजगार मिळणार आहे.  महिलांना लागणाऱ्या कुर्ती ,अन्य कपडे आणि गोधड्या बनवण्याचे प्रशिक्षण आणि उत्पादन येथे केले जाणार आहे. या केंद्राच्या उभारणीत प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक श्री महेंद्रकुमार जवारीलालजी जैन आणि अरुण ओझा यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर सहयोग दिला.

Protected Content