लज्जास्पद : जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या प्रमाणात प्रचंड घट

जळगाव, जयश्री निकम | नॅशनल हेल्थ सर्व्हेच्या ताज्या अहवालात देशभरात मुलींचे प्रमाण वाढले असले तरी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यात लक्षणीय घट झाली असल्याचे दिसून आले आहे. आपल्यासाठी अतिशय लज्जास्पद बाब म्हणजे जळगाव जिल्ह्यातील महिलांचे दर हजारी पुरूषांच्या तुलनेत प्रमाण घटले असून बेटी बचाओ-बेटी पढाओ या मोहिमेचा जळगावात काडीचाही उपयोग झाला नसल्याचे ताज्या आकडेवारीतून सिध्द झाले आहे. वाचा या संदर्भातील लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा एक्सक्लुझीव्ह वृत्तांत.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. विनोद कुमार पॉल आणि भारत सरकारच्या केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी २४ नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीत भारत आणि १४ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसाठी २०१९-२१ राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-५) ची (टप्पा -२ अंतर्गत एकत्रित ) लोकसंख्या, प्रजनन आणि बाल आरोग्य, कुटुंब कल्याण, पोषण आणि अन्य संदर्भातील प्रमुख निर्देशकांची तथ्यपत्रके (फॅक्टशीट ) प्रसिद्ध केली आहेत.

या अहवालातील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे देशात पहिल्यांदाच पुरूषांपेक्षा महिलांचे प्रमाण आणि स्त्री जननदरात वाढ झाल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. सर्वेक्षणातल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात सध्या एक हजार पुरुषांमागे १०२० महिला आहेत. महिलांच्या दर हजारी प्रमाणात झालेली वाढ ही अतिशय सकारात्मक असून महिला सक्षमीकरणाचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

एकीकडे देशभरात महिलांचे प्रमाण वाढलेले असतांना प्रगत समजल्या जाणार्‍या महाराष्ट्रात स्त्रीयांच्या प्रमाणात घट झाल्याची बाब या अहवालातून दिसून आलेली आहे. यातील सर्वात धक्कदायक बाब म्हणजे महिलांचे सर्वात कमी प्रमाण असणार्‍या जिल्ह्यांमध्ये जळगावचा समावेश असल्याचेही या अहवालातील निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे.

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार जळगाव जिल्ह्यातील सध्याचे महिलांचे प्रमाण एक हजार पुरूषांमध्ये ८५७ इतके घसरले आहे. गेल्या पाच वर्षांआधीच्या सर्वेक्षणात हाच आकडा ९२४ महिला दर हजारी इतका होता. यामुळे पाच वर्षांमध्येच प्रति हजारी ५७ इतकी महिलांच्या प्रमाणात घट झालेली आहे. यामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये महिलांचे प्रमाण हे अतिशय लक्षणीय प्रमाणात घटल्याची धक्कादायक बाब आढळून आलेली आहे.

जळगाव जिल्हा मध्यंतरी सोनोग्राफीच्या सहाय्याने लिंगनिदान करून गर्भपात करण्याच्या पॅटर्नमुळे गाजला होता. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही बुरसटलेली मानसिकता याला कारणीभूत होती. सुदैवाने प्रशासनाच्या तत्परतेमुळे आता हा प्रकार थांबल्याचे वरकरणी दिसून येत आहे. मात्र महिलांचे कमी झालेले प्रमाण ही जिल्ह्यासाठी नामुष्कीची बाब मानली जात आहे. बहिणाबाई चौधरी आणि प्रतिभाताई पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यासाठी ही लज्जेची बाब मानावी लागणार आहे.

केंद्रात मोदी सरकार सत्तारूढ झाल्यापासून बेटी बचाओ-बेटी पढाओ अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा इतर राज्यांमध्ये व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला परिणाम होत असल्याचे दिसून आले असले तरी जळगाव जिल्ह्यात मात्र याच्या विपरीत चित्र दिसून आले आहे. जिल्ह्यातील महिलांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रशासनाने दूरगामी योजनांचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. तरच जिल्ह्यात महिलांचे प्रमाण वाढेल.

Protected Content