मोठी बातमी : संघ प्रणीत ‘धर्म जागरण’च्या मंचावर आ. शिरीषदादा चौधरी !

जामनेर- Exclusive लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोद्री येथे पार पडलेल्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत धर्म जागरण मंचाच्या महाकुंभात कॉंग्रेसचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी लावलेली उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. तर त्यांनी स्वत: आपण फक्त बंजारा समाजबांधवांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याचे प्रतिपादन केले आहे.

तालुक्यातील गोद्री येथे बंजारा, लबाणा-नायकडा समाजाचा महांकुभ आज पार पडला. यात देशभरातील १० लाखांपेक्षा जास्त आबालवृध्दांनी हजेरी लावली. या महाकुंभाचे आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील धर्म जागरण समितीने केले होते. यामुळे साहजीक संघ परिवार याच्या आयोजनासाठी अहोरात्र झटत होता. तर, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी याला पडद्याआड मोठ्या प्रमाणात मदत केली. या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री व आजी-माजी आमदारांनी हजेरी लावली. यात साहजीकच भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्यांचा समावेश होता.

दरम्यान, याच महाकुंभात काल अर्थात, २९ जानेवारी रोजी दुपारी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी उपस्थिती लावली. लक्षणीय बाब म्हणजे ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांच्यासह स्थानिक नेत्यांनी धर्मसभेच्या व्यासपीठावर जाणे टाळले असतांना आमदार शिरीषदादा चौधरी हे थेट व्यासपीठावर धर्म जागरण समितीचे महामंत्री शरदराव ढोले यांच्या मागे स्थानापन्न झाले. थोड्या वेळानंतर त्यांनी तेथून निघून जात महाकुंभातील विविध ठिकाणी भेटी दिल्या.

बंजारा, लबाणा-नायकडा समाज महाकुंभ हा सर्व धर्मियांसाठी खुला कार्यक्रम असल्याने कुणीही याला उपस्थित राहण्यात काहीही गैर नाही. आमदार शिरीषदादा चौधरींनी याला उपस्थिती लावण्याची बाब देखील गैर नाही. नक्कीच कुणीही या कार्यक्रमाला जाऊ शकतो. आणि लोकप्रतिनिधी म्हणून जाण्यात चुकीचे काहीही नाही. तथापि, कॉंग्रेस आणि संघ विचारधारेतील तीव्र संघर्ष लक्षात घेता शिरीषदादांनी महाकुंभाला भेट देतांना थेट व्यासपीठ गाठल्याने चर्चेला उधाण आले आहे. अलीकडेच त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना जाहीर पाठींबा दिला होता. ते तांबे यांच्या सोबत उघडपणे फिरले होते. एवढेच नव्हे तर शिरीषदादांचा संपूर्ण मधुस्नेह परिवार देखील तांबे यांच्या सोबतच असल्याचे दिसून आले होते. या पाठोपाठ थेट संघ परिवारातील धर्म जागरण समितीच्या कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती ही चर्चेला आमंत्रण देणारी नक्की ठरली आहे. ”मुलाच्या पाठोपाठ वडिलांनी देखील ‘पार्टी लाईन’ क्रॉस केली का ?” हा विषय यातून अधोरेखीत झाला आहे.

‘लाईव्ह ट्रेंडस न्यूज’ कधीच कोणतेही वृत्त एकांगीपणे प्रसिध्द करत नाही. याच अनुषंगाने आम्ही सदर बातमी प्रकाशित करण्याआधी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्याशी संपर्क साधत त्यांनी बाजू जाणून घेतली. याप्रसंगी त्यांनी यावर विस्तृत विवेचन केले. ते म्हणाले की, ”माझ्या मतदारसंघात पाल आणि अभोडा तसेच परिसरात बंजारा समाज हा मोठ्या प्रमाणात आहे. पाल येथील वृंदावन आश्रमाचे प्रमुख गोपाल चैतन्यजी महाराज हे माझे स्नेही असून त्यांनीच मला या महाकुंभासाठी आमंत्रीत केले होते. यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला हजेरी लावणे माझे आद्य कर्तव्य होते. यानुसार मी हजेरी लावली !” या कार्यक्रमाचे आयोजक कुणीही असले तरी समाजबांधवांशी बांधिलकी असल्याने आपण येथे उपस्थित राहिल्याचे त्यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना स्पष्ट केले.

Protected Content