खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय तंत्रनिकेतन खामगांव या संस्थेमध्ये शैक्षणीक वर्ष २०२३-२४ करीता संस्थेने आपली १०० टक्के प्रवेशाची गेली कित्येक वर्षापासूनची परंपरा कायम राखण्यात यश आले आहे.
यामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका व बारावी आणि आय.टी.आय. झालेल्या विद्यार्थ्यांचे थेट व्दितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका या दोन्ही प्रकारांच्या प्रवेशाचा अंतर्भाव आहे. संपूर्ण राज्यात यावेळेस तंत्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद राहिलेला आहे. नव्याने रुजु झालेले महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण विभागाचे संचालक माननीय डॉ. विनोद मोहितकर यांचे नेतृत्व, अमरावती विभागाचे सहसंचालक डॉ.विजय मानकर यांनी दिलेल्या मार्गदर्शनाअंतर्गत व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ मुंबईचे संचालक डॉ प्रमोद नाईक यांच्या वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याने संस्थेने हे यश संपादन करण्यात यश मिळविलेले आहे, असे प्रतिपादन संस्थेचे प्राचार्य डॉ.समीर प्रभुणे यांनी केलेले आहे.
या यशामध्ये प्रथम वर्ष पदविका प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा.समीर कुळकर्णी व थेट व्दितीय वर्ष पदविका प्रवेश समितीचे अध्यक्ष प्रा.अरुण काकड, विविध विभा्रप्रमुख आणि दोन्ही समितीतील सदस्यांनी भरपुर परिश्रम घेऊन सदरील १०० टक्के प्रवेशाचे लक्ष्य गाठण्यात यश मिळविलेले आहे, ही बाब निश्चितच संस्थेसाठी भुषणावह ठरावी अशी आहे. संस्थेत सध्या अणुविद्युत विभागाने 3 वर्षांसाठी राष्ट्रीय प्रमाणन संस्थेव्दारे एन.बी.ए. मानांकन मिळविलेले आहे आणि यावर्षी स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व संगणक अभियांत्रिकी विभाग एन.बी.ए. मानांकनासाठी सिध्द झालेले आहेत तर पुढील वर्षी विद्युत अभियांत्रिकी विभाग सदर मानांकन मिळविण्यासाठी पात्र ठरेल. प्राचार्य डॉ.समीर प्रभुणे यांनी संस्थेने १०० टक्के दोन्ही स्तरावरील प्रवेशाची गेली कित्येक वर्षापासुनची आपली परंपरा कायम राखण्यात यश मिळविल्याबद्दल संस्थेतील संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केलेले आहे आणि भविष्यातही शासकीय तंत्रनिकेतन खामगांवची ही उज्वल परंपरा अशीच कायम राखली जाईल असा आशावाद व्यक्त केलेला आहे.