राज्यपालांच्या सल्ल्यानंतर राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन

मुंबई : वृत्तसंस्था । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना फोन केला आहे. वाढीव वीज बिलं आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता.

हा सल्ला ऐकून राज ठाकरेंनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळते आहे. राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. मात्र भेटीबाबत काही ठरलेलं नाही असंही शरद पवार यांनी सांगितलं आहे. राज्यपालांनी आपल्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे असं ते फोनवर म्हणाल्याचं पवारांनी सांगितलं.

लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळं अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या दूध दराचा मुद्दा आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचलून धरला आहे. शेतकऱ्यांकडून दूध संकलन करणाऱ्या मोठ्या संस्था एका लिटरमागे १७ ते १८ रुपये देतात आणि स्वत: मात्र भरघोस नफा कमावतात. त्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला किमान २७ ते २८ रुपये दर मिळावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. दरम्यान या दोन प्रमुख मागण्या घेऊन राज ठाकरे जेव्हा राज्यपालांना भेटले तेव्हाच राज्यपालांनी त्यांना शरद पवारांना फोन करण्याचा सल्ला दिला होता. तो सल्ला ऐकत राज ठाकरे यांनी आज शरद पवारांशी फोनवरुन चर्चा केली आहे.

Protected Content