नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अवघ्या चार वर्षांसाठी भारतीय सैन्यदलात नोकरीची संधी देण्यासाठी केंद्र सरकारने आता मिशन अग्नीपथची घोषणा केली आहे. आज सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याकडून देशात १० लाख नोकर्या देण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या पाठोपाठ संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन एक महत्वाची घोषणा केली.
राजनाथसिंह म्हणाले की, संरक्षण मंत्रालयातर्फे मिशन अग्नीपथ सादर करण्यात आले असून यात तरुणांची सैन्यात चार वर्षांसाठी भरती केली जाणार आहे. हे जवान नाही तर अग्नीवीर संबोधले जाणार. या दरम्यान अग्निवीरांना आकर्षक पगार मिळेल. तर सेवेनंतर सेवा निधी पॅकेज उपलब्ध होईल. या योजनेंतर्गत भरती झालेल्या बहुतांश सैनिकांना चार वर्षांनी मुक्त केले जाईल. मात्र, काही जवान आपली नोकरी सुरू ठेवू शकतील. अग्नीवीर या पदासाठी १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना संधी मिळेल. प्रशिक्षण १० आठवडे ते ६ महिन्यांचे असेल. या अग्नीवीरसाठी दहावी आणि बारावीचे विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत. दरवर्षी अग्निवीरांच्या ५० हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा संरक्षण मंत्र्यांनी दिली.
संरक्षण मंत्रालयानुसार अग्निपथ योजनेद्वारे सैन्यात आलेल्या तरुणांना पहिल्या वर्षी ४.७६ लाखांचे पॅकेज मिळेल. चौथ्या वर्षी हे पॅकेज ६.९२ लाखांवर जाईल. याशिवाय अन्य भत्ते देखील दिले जातील. चार वर्षांनंतर या अग्निवीरांना ११.७ लाख रुपए सेवा निधी दिला जाणार असून यावर कोणताही कर नसेल अशी माहिती देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याप्रसंगी दिली आहे.