संतोषभाऊ नेमके कसे अडकले ? जाणून घ्या ‘ते’ खंडणी प्रकरण !

भुसावळ-इकबाल खान | तब्बल सुमारे एक तपानंतर माजी आमदार संतोष चौधरी यांना खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. कधी काळी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असलेल्या या नेत्याला खंडणी प्रकरणामुळे मोठा मनस्ताप तर सहन करावाच लागला, पण त्यांच्या करियरला ब्रेक देखील लागला. आता शिक्षेला स्थगिती मिळाल्याने ते नवीन उमेदीने कामाला लागण्याची शक्यता आहे. तर आज आपण जाणून घेऊया हे प्रकरण नेमके काय आहे ते ?

संतोष चौधरी यांची राजकीय कारकिर्द १९९१ साली नगरसेवकपदापासून सुरू झाली. ते पहिल्यांदा उपनगराध्यक्ष तर १९९८ साली नगराध्यक्ष बनले. भुसावळ शहरातील तत्कालीन राजकीय नेतृत्वाच्या अनास्थेमुळे निर्माण झालेली पोकळी त्यांनी झपाट्याने भरून काढली. शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने त्यांना लोकप्रियता देखील लाभली. यामुळे प्रचंड महत्वाकांक्षी असणार्‍या चौधरींनी शिवसेनेकडून तिकिट न मिळाल्याने भुसावळ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करत लक्षणीय मते घेतली. यात त्यांचा पराभव झाला तरी नव्यानेच स्थापन झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये त्यांची राजकीय वाटचाल सुरू झाली. भुसावळ नगरपालिका हे त्यांचे शक्तीस्थान बनले. १९९९ ते २०१६ या कालावधीत २००६ ते २००८ या अडीच वर्षाचा कालावधी वगळता भुसावळ नगरपालिकेत चौधरीराज होते. यातच दिवसेंदिवस त्यांची राजकीय शक्ती वाढत गेली. २००४ साली ते स्वत: तर मतदारसंघ राखीव झाल्याने २००९ साली त्यांचे आधीचे पीए संजय सावकारे हे आमदार बनले. जिल्ह्याच्या राजकारणात चौधरी यांची जबरदस्त चलती सुरू झाली असतांना त्यांच्या वाटचालीत अडथळे देखील आलेत.

संतोष चौधरी यांच्या वाटेतील पहिला मोठा अडथळा हा सानिया कादरींच्या रूपाने आला. कधी काळी चौधरी यांच्यासोबत असणारी सानिया काही वर्षात त्यांच्या समोर उभी ठाकली. यातून चौधरी यांना कुणी आव्हान देऊ शकते असा पहिला संदेश गेला. चौधरी आणि कादरी वादात भुसावळात अनेक भयंकर घटना घडल्या. त्यात तत्कालीन नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांच्या पुत्राचा हकनाक बळी गेला. एकीकडे सानियाने संतोषभाऊंना आव्हान दिले असतांना दुसरीकडे त्यांच्या भोवती एक फास विणला जात होता. याचा जरादेखील सुगावा त्यांना लागला नाही. यातूनच खंडणी प्रकरणात त्यांना मध्ये जावे लागले.

२००६ सालच्या नगरपालिका निवडणुकीत संतोष चौधरी यांचा दारूण पराभव झाला. तथापि, सत्ताधार्‍यांमधील फुटीचा लाभ घेत ते अडीच वर्षांनी पुन्हा सत्तेत आले. याप्रसंगी त्यांच्या सोबत अनेक नगरसेवक आलेत. यात जुना सातारा भागातील नगरसेवक उल्हास नरेंद्र पाटील ( आता स्वर्गवासी !) यांचा देखील समावेश होता. त्यांचे मेहुणे चंद्रशेखर अत्तरदे हे रिअल इस्टेट व्यवसायातील मोठे नाव मानले जात होते. त्यांनी भुसावळात काही प्रोजेक्ट सुरू केले. यात त्यांनी शहरातील गट क्रमांक ७८१-ब मध्ये दोन हेक्टर जमीन खरेदी करून ती एनए करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेत प्रकरण सादर केले होते.

या प्रकरणात त्यांना नगरपालिकेतील एका कर्मचार्‍याच्या माध्यमातून एक कोटी रूपयांचा खंडणी मागण्यात आली होती. यातील दुसरा टप्पा देतांना चंद्रशेखर अत्तरदे यांनी पोलीसात तक्रार दिली. यामुळे संतोष चौधरी यांना २९ जुलै २०११ रोजी सायंकाळी एलसीबीच्या पथकाने अटक केली होती. यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत हे प्रकरण त्यांच्यासाठी बदनामीचा एक डाग बनले होते. आज जिल्हा न्यायालयाच्या निकालाने याची भरपाई होणार आहे. कदाचित हे प्रकरण उच्च वा सर्वोच्च न्यायालयातही जाईल. तथापि, तूर्तास चौधरी यांना दिलासा मिळालाय हे कुणाला अमान्य करता येणार नाही.

संतोष चौधरी यांना अटक झाली तेव्हा राज्यात त्यांच्याच राष्ट्रवादीचे सरकार होते, गृहमंत्री देखील राष्ट्रवादीचेच आर. आर. पाटील तर जिल्ह्याचे पालकमंत्री देखील त्यांच्याच पक्षाचे गुलाबराव देवकर हे होते. असे असतांनाही चौधरी यांना झालेली अटक ही राजकीय वर्तुळात रहस्यमय मानली गेली. हा खटला कागदोपत्री इतका मजबूत बनविण्यात आला होता की, चौधरी यांना प्रदीर्घ काळ जामीन मिळाला नाही. यात त्यांना २ वर्षे १ महिना आणि १८ दिवसांची शिक्षा झाली. ही शिक्षा त्यांनी आधीच भोगलेली असल्यामुळे हा निकाल लागताच ते कारागृहाच्या बाहेर आले.

दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या. यात प्रामुख्याने संतोष चौधरींच्या सहकार्याने निवडून आलेल्या संजय सावकारेंना मंत्रीपद मिळाले. यानंतर त्यांनी एकनाथराव खडसे यांची संगत धरून भाजपमध्ये प्रवेश केला. स्वत: चंद्रशेखर अत्तरदे यांनी देखील भाजपमध्ये सक्रीय होत नगरसेवकपद मिळविले. त्यांच्या सौभाग्यवती जि.प. सदस्या तर मातोश्री नगरसेविका बनल्या. त्यांनी जळगाव ग्रामीणमधून विधानसभाही लढविली. मात्र यात ते पराभूत झाले. तर दुसरीकडे संतोष चौधरी यांच्या साम्राज्यालाही सुरंग लागला. २०१६च्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचे पुत्र सचिन चौधरी पराभूत झाले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे बंधू अनिल चौधरी यांना देखील पराभव सहन करावा लागला. यानंतर त्यांचे कट्टर राजकीय शत्रू एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने संतोषभाऊंची ‘राजकीय स्पेस’ कशी असेल ? याची त्यांच्या चाहत्यांना चिंता लागली असतांनाच आजच्या कोर्टाच्या निकालाने त्यांना दिलासा मिळणार आहे. यातून ते पुढील काळात भरारी घेणार का ? याकडे सर्वांची नजर असेल. तूर्तास आजचा दिवस हा चौधरी प्रेमींसाठी नक्कीच मोठे ‘सेलीब्रेशन’ करण्यासारखा आहे.

Protected Content