पंतप्रधान मोदींचे पदवी प्रकरण : केजरीवालांची उच्च न्यायालयात धाव

अहमदाबाद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी नेमकी कोणती ? याची खातरजमा करण्यासाठी केलेल्या मागणीवर अरविंद केजरीवाल यांनी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिकेच्या माध्यमातून धाव घेतली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा हा अनेकदा राजकीय वर्तुळासह सोशल मीडियात चर्चेचा विषय बनलेला आहे. यातच आता अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी न्यायालयीन लढ्याची नव्याने तयारी केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी याआधीच  एप्रिल २०१६ मध्ये  केंद्रीय माहिती आयोगाला  पत्र लिहून पंतप्रधान मोदींच्य शैक्षणिक पात्रतेशी संबंधित माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली होती. मोदींच्या शैक्षणिक माहितीबद्दल संभ्रम दूर करण्यासाठी पदवी सार्वजनिक करावी, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.

 

केजरीवालांच्या या मागणीनंतर सीआयसीला केजरीवाल यांना पीएम मोदींच्या गुजरात विद्यापीठातून एमए पदवीबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आलं. त्यानंतर सीआयसीच्या या आदेशाला विद्यापीठाने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. गुजरात उच्च न्यायालयाने ३१ मार्च रोजी दिलेल्या निकालात सीआयसीचा हा आदेश रद्द ठरवला आणि यासोबतच याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

 

अरविंद केजरीवाल यांनी या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी ७ जुलै रोजी होणार असून यात नेमके काय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content