आधी जामनेरचा विकास करा : डॉ.सतीश पाटलांचे आव्हान

जळगाव प्रतिनिधी । मंत्री गिरीश महाजन यांनी आधी जामनेरचा तरी विकास करून दाखवावा मगच बारामतीतून लढण्याची भाषा करावी असे आव्हान आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिले आहे.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अलीकडेच आपण बारामतीतूनही विजय मिळवून दाखवू असे वक्तव्य केले आहे. याला राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, बारामती जिंकण्यापूर्वी त्यांनी मंत्रिपदाचा वापर करून राज्याचा नव्हे, जिल्ह्याचा नव्हे तर किमान जामनेरचा विकास करून दाखवला पाहिजे. जामनेरमध्ये ९० पेक्षा जास्त गावे टँकरसाठी तरसली आहेत. सत्ता नेहमी येत नाही. त्यात मंत्री महाजनांनी आपली मर्यादा ओळखून जिल्ह्याचा नव्हे तर किमान जामनेर तालुक्याचा तरी विकास करून दाखवला पाहिजे. बारामतीपेक्षा जास्त विकास करण्याची घोषणा केली असती तर जनतेने त्यांचे स्वागत केले असते. पण बालिश वक्तव्य करून त्यांनी आपली राजकीय उंची अधोरेखित केल्याचा टोला डॉ. सतीश पाटील यांनी लगावला आहे. गिरीश महाजन यांनी १०० निवडणुका जिंकल्या असतील, ते महत्त्वाचे नाही. त्यांच्या राजकीय वजनाचा त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी किती उपयोग केला, हा खरा प्रश्‍न असल्याचे डॉ. पाटील नमूद केले.

Add Comment

Protected Content