


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहराचे विद्रुपीकरण रोखणे, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि महानगरपालिकेचा महसूल वाढविण्याच्या उद्देशाने मनपा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. उपमहापौर मनोज चौधरी यांची पायुक्त पंकज गोसावी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत शहरातील होर्डिंग, अनधिकृत जाहिराती आणि कर वसुलीबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत जळगाव महानगरपालिका हद्दीतील सर्व मोठ्या होर्डिंगचे प्रथमच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात सध्या एकूण २२६ मोठे होर्डिंग असून, या सर्व होर्डिंगची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी केली जाणार आहे. या स्ट्रक्चरल ऑडिटचा खर्च संबंधित होर्डिंग धारकांनाच करावा लागणार असून, प्रत्येक होर्डिंगसाठी अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटची जबाबदारी शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये होर्डिंगची वेल्डिंग, नट-बोल्टची स्थिती, लोखंडाला लागलेला गंज, संपूर्ण स्ट्रक्चरची मजबुती तसेच विद्युत सुरक्षेची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे धोकादायक किंवा कमकुवत होर्डिंगमुळे होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यास मदत होणार आहे. शहरातील काही ठिकाणी परवानगीपेक्षा अधिक होर्डिंग लावण्यात आल्याचेही बैठकीत समोर आले आहे. काही होर्डिंग धारकांनी एका परवानगीवर अतिरिक्त दोन होर्डिंग उभारल्याचे निदर्शनास आले असून, अशा अनधिकृत जाहिरात फलकांवर मनपाकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.
याशिवाय शहरातील खांबांवर लावण्यात येणारे पोस्टर्स, स्टिकर्स, छोटे बॅनर्स तसेच प्रभागनिहाय असलेल्या अनधिकृत जाहिराती हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जाहिरातदारांवर कारवाई करण्याबरोबरच आवश्यक शुल्क आकारून त्यांना नियमांच्या चौकटीत आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीवरही बैठकीत विशेष भर देण्यात आला. मनपाचा कर कोणीही बुडवू नये, तसेच जाहिरात शुल्क आणि इतर महसूल नियमितपणे जमा व्हावा यासाठी संबंधित विभागांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल वाढल्यास शहरातील विकासकामांना अधिक गती मिळू शकते, या उद्देशाने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
जळगाव शहरातील अनधिकृत जाहिरातींमुळे होणारे विद्रुपीकरण थांबवणे आणि शहराचे सौंदर्य अबाधित ठेवणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे. उपमहापौर मनोज चौधरी, सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील आणि उपायुक्त पंकज गोसावी यांच्या संयुक्त नियोजनातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.



