जळगाव प्रतिनिधी । पोलीस असल्याची बतावणी करून शहरातील जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाच्या हातातील मोबाईल लांबविणाऱ्या दोन तोतया पोलीसांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत केला आहे.
याबाबत माहिती अशी की, पोलीस कर्मचारी असल्याची बतावणी करून जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एकाच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याप्रमाणे जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी जळगाव शहरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक पाटील, पो.ना. प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल बैसाणे, सचिन महाजन, अशोक पाटील, संदीप सावळे आणि ईश्वर पाटील यांनी संशयित आरोपी जहीर मोहम्मद नूर मोहम्मद वय 28 रा. भिलपूरा चौक, मरीमाता मंदिर जळगाव आणि जुबेर खान वाहब खान (वय-२१) रा. इस्लामपूरा, जळगाव यांना गोपनीय माहितीच्या आधारे शनिवारी १५ जानेवारी रोजी अटक केली. त्यांच्या ताब्यातील चोरीचा १० हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत केला आहे. दोघांना जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.