जळगाव, प्रतिनिधी । कुलगुरू प्रा. डॉ. ई. वायूनंदन यांच्या हस्ते डिजीटल शिक्षण, तंत्रज्ञान, संसाधने, पद्धती आणि उपयोगाबद्दलची नाविन्यपूर्ण माहिती असलेले इंग्रजी भाषेतील ‘डिजिटल एज्युकेशन’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे डिजिटल शिक्षण आणि डिजिटल संसाधनांचा वाढता वापर लक्षात घेता या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि शिक्षणाप्रती आवड असलेल्या सर्व व्यक्तींसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. या पुस्तकामध्ये डिजीटल शिक्षण, तंत्रज्ञान, संसाधने, पद्धती आणि उपयोगाबद्दलची नाविन्यपूर्ण माहिती इंग्रजी भाषेतून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पुस्तकात शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचे संशोधन लेख समाविष्ट करण्यात आले आहे. सदर पुस्तकाचे विमोचन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू ई.वायूनंदन यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाला डॉ. ई वायूनंदन यांची प्रस्तावना लाभली असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलसचिव बी. व्ही. पवार यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे.
पुस्तकाचे संपादन विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कृत के. ए. के. पी. संस्थेचे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाचे सहा.प्राध्यापक डॉ. संतोष खिराडे यांनी केले आहे, तर प्रशांत पब्लिकेशनच्या वतीने पुस्तक प्रकाशित करण्यात आले. याप्रसंगी प्र. कुलगुरू प्रा. डॉ. वायूनंदन, हितेश ब्रिजवासी, डॉ. संतोष खिराडे, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते.