ब्रेकींग : हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनीतील संप मागे !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बांभोरी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनीत कामावरून काढून टाकलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे तसेच वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी पुकारण्यात आलेला बेमुदत संप व्यवस्थापनाने बहुतांश मागण्या मान्य केल्याने मागे घेण्यात आला आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, बांभोरी येथील हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टीम कंपनी ( आधीची बॉश कंपनी ) येथे कामगार गेल्या सुमारे २० दिवसांपासून आंदोलनास बसले होते. कंपनी व्यवस्थापनाने कामगार हितासाठी धडपडणार्‍या पाच कामगारांना कामावरून काढून टाकल्याने त्यांना कामावर घेण्यात यावे. तसेच, कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामगारांप्रमाणेच वेतनात योग्य वाढ देण्यात यावी आदी पाच मागण्या कामगार संघटनेने केलेल्या होत्या.

दरम्यान, या आंदोलक कर्मचार्‍यांना पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकार्‍यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला होता. गेल्या काही दिवसांपासून कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगार संघटनेत चर्चा सुरू होती. यात आमदार सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा झाली. यात वेतनवाढीची मागणी मान्य करण्यात आली असून काढून टाकलेल्या पाच कर्मचार्‍यांना फक्त काही दिवसांसाठी बदली करून नंतर त्यांना येथे नियुक्त करण्याचे आश्‍वासन देखील देण्यात आले आहे.

कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगार संघटनांमधील बोलणी यशस्वी झाल्यामुळे कामगारांनी आज आपला संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. अर्थात, उद्या सकाळी सात वाजेपासून हिताची अस्टेमो ब्रेक लिमिटेड ही कंपनी पुन्हा एकदा सुरू होणार आहे. आज कामगारांनी जल्लोषात या निर्णयाचे स्वागत केले.

Protected Content