६०० माजी सैनिक पत्नींच्या बचत गटाची ट्रॅव्हल्स कंपनी !

पणे : वृत्तसंस्था । सहा जिल्ह्यांमधील ६०० माजी लष्करी जवानांच्या पत्नींनी बचत-गटांमार्फत ट्रॅवल्स कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. पुणे महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) ४४ बस भाडेतत्वावर घेतल्या आहेत. शहरातील सर्व रस्त्यांवर या बस धावणार आहेत.

बस खरेदी करण्यासाठी महिलांनी स्वत: च्या बचतीतून बँकेतून कर्ज घेतले. राज्य सैनिक कल्याण मंडळातून आर्थिक मदत मिळाल्यास या उपक्रमाला हातभार लागेल, असे मत या महिलांनी व्यक्त केले आहे. सातारा जिल्ह्यात असलेल्या विश्व योद्धा शेतकरी मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे एकत्र येत राज्यभरातील ४४ बचत गटांनी प्रत्येकी एक बस खरेदी केली आहे. या कंपनीने सात वर्षांच्या बसगाड्या चालविण्याबाबत करार केला आहे. कंपनीने दरमहा सरासरी ६००० किमी अंतर निश्चित दरासह पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

माजी सैनिकांच्या बचत गटांमार्फत असा पुढाकार घेवून ट्रान्सपोर्ट कंपनी पहिल्यांदाच स्थापन करण्यात आली आहे, असे कर्नल (निवृत्त) आर.आर. जाधव म्हणाले. जाधव हे राज्य सैनिक कल्याण विभागाचे कार्यकारी संचालक आहेत.

सातारा जिल्ह्यातील सैनिक कल्याण विभागात जाधव यांच्या कार्यकाळात माजी सैनिक सुरेश गोडसे यांनी ही कल्पना सुचवली होती. “एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन माजी सैनिकांच्या पत्नींकडून १८.०४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणे सोपे नव्हते. सुदैवाने, हा उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले आहे,” असे सुरेश गोडसे यांनी सांगितले.

४१ लाख किंमत असलेली प्रत्येक बस खरेदी करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रने बचत गटांना कमी व्याज दराने ३४ लाखांचे कर्ज दिले आहे तर उर्वरित रक्कम महिलांनी भरली आहे.

महिला बचत गटांपैकी प्रत्येकाला मिळकत म्हणून दरमहा २५,००० रुपये मिळतील, संपूर्ण महिन्यासाठी बसचा एकूण खर्च काढून प्रशासकीय खर्चासाठी ७ हजार रुपये कंपनीला देण्यात येतील. साधारणपणे पाच वर्षांत कर्जाची परतफेड झाल्यानंतर प्रत्येक बचत गटांना दरमहा ६० हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळेल असे गोडसे यांनी सांगितले.

सध्या पीएमपीएमएलने कात्रजजवळ गुजरावाडी येथे या बसच्या पार्किंगसाठी स्वतंत्र बस डेपो दिला आला आहे.

Protected Content