१० दिवसांमध्ये बिहारमधील १६ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा

 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील १० दिवसांमध्ये बिहारमधील १६ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा आणि उद्घाटन करणार आहे. पहिली घोषणा रविवारी करण्यात आली. मोदींनी बिहारमधील तीन इंधन प्रकल्पांची घोषणा केली. या प्रकल्पांची किंमत ९०० कोटी इतकी आहे.

बिहारमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोदींकडून बिहारसाठी काही खास योजनांची घोषणा केली जाणार आहे. प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम आणि लोकांच्या जीवनाशी निगडीत गोष्टींसंदर्भात हे प्रकल्प असतील गॅस पाईपलाइनचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूरपासून बिहारमधील बांकापर्यंत नवीन गॅस लाईन आणि एलपीजी बोल्टींग प्रकल्प उभारण्यात येणार. त्याचप्रमाणे पूर्व चंपारणमधील हरीसिद्धी येथेही इंधन प्रकल्प उभारण्यात येणार आहे.
केंद्र सरकारकडून पुढील काही दिवसांमध्ये बिहारसाठी १६ हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात येणार आहे. केंद्राकडून जाहीर करण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमध्ये नमामि गंगे प्रकल्पाअंतर्गत जलशुद्धीकरण प्रकल्प, पाटबंधारे योजना, नदीविकास प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग, रेल्वेचे पूल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विजपुरवठ्यासंदर्भातील प्रकल्प, हायवे प्रकल्पांसंदर्भातील, नवीन उड्डाणपुलांसंदर्भातील घोषणाचा समावेश आहे. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांआधीच एनडीएत फूट पडली आहे. एनडीएतील घटक पक्ष लोकजनशक्ती पार्टीने संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. बिहारमधील कोरोना संसर्गाची परिस्थिती आणि मुसळधार पावसामुळे उद्भवलेली पूरस्थिती यामुळे नितीशकुमार यांची नकारात्मक प्रतिमा तयार झाली आहे. त्यामुळेच ही निवडणूक नितीशकुमार यांच्यासाठी अवघड ठरणार आहे.
====================

Protected Content