Home Cities मुक्ताईनगर हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची मागणी ; आमदार चंद्रकांत पाटील यांचे...

हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याची मागणी ; आमदार चंद्रकांत पाटील यांचे तापी पाटबंधारे विकास महामंडळाला निवेदन

0
8

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. सध्या अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू असून, या पाण्याचा योग्य वापर करून दरवर्षाप्रमाणे यंदाही हतनूर धरणातून भुसावळ तालुक्यातील ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

याबाबत आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता, जळगाव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. हतनूर धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून अतिरिक्त पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या अतिरिक्त पाण्याचे नियोजन करून ते ओझरखेडा धरणात वळविल्यास परिसरातील जलसाठा वाढण्यास मोठी मदत होईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. ओझरखेडा धरण हे भुसावळ तालुक्यासह आसपासच्या परिसरातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे जलस्रोत आहे. धरणातील पाणीसाठा वाढल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होऊन खरीप हंगामातील पिकांसह आगामी रब्बी हंगामातील शेतीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हतनूर धरणातील अतिरिक्त पाण्याचा उपयोग ओझरखेडा धरणासाठी करणे गरजेचे असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. दरवर्षी हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्यात येते. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो. यंदाही ही प्रक्रिया तातडीने राबवून ओझरखेडा धरणात पाणी सोडण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे केली आहे.


Protected Content

Play sound