Home Cities पारोळा पद्मालय येथे राज्यस्तरीय बॉटनिकल गार्डन; जूनपाणी महादेव मंदिराच्या विकासालाही चालना

पद्मालय येथे राज्यस्तरीय बॉटनिकल गार्डन; जूनपाणी महादेव मंदिराच्या विकासालाही चालना

0
8

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पर्यटन, पर्यावरण आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला चालना देण्यासाठी आमदार अमोल पाटील यांनी मुंबई येथे राज्याचे वनेमंत्री गणेश नाईक यांची सदिच्छा भेट घेऊन विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये पद्मालय येथे राज्यस्तरीय बॉटनिकल गार्डन व इको-टुरिझम प्रकल्प उभारण्याबरोबरच वाघरे येथील जूनपाणी महादेव मंदिर परिसराच्या विकासाचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला.

बैठकीत पद्मालय येथील वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या सुमारे १०० एकर जागेवर राज्यस्तरीय बॉटनिकल गार्डन आणि इको-टुरिझम प्रकल्प मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वैभव लाभलेल्या पद्मालयचा पर्यटन विकास या प्रकल्पामुळे अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे जतन, स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि राज्याच्या पर्यटन नकाशावर पद्मालयचे स्थान अधिक भक्कम करणे, या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय वाघरे (ता. पारोळा) येथील प्राचीन व ऐतिहासिक जूनपाणी महादेव मंदिर परिसराचा विकास, उद्यान निर्मिती, सुशोभीकरण, पर्यटकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा आणि इतर विकासकामांबाबतही वनेमंत्री गणेश नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका वनेमंत्र्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार अमोल पाटील यांनी मतदारसंघाच्या पर्यटन, पर्यावरण आणि स्थानिक विकासाला गती देणारे हे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर मंजूर व्हावेत, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पांमुळे एरंडोल विधानसभा मतदारसंघातील पर्यटनाला नवी दिशा मिळण्याबरोबरच स्थानिक रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound