नागपूर (वृत्तसंस्था) संघावर बंदी येईल, तेव्हाच मनुवाद संपेल. मनूस्मृती आणि संविधानाच्या लढाईत संविधानच जिंकणार आहे. इथे दोन विचारांचा संघर्ष आहे. हे मनुस्मृती मानतात, आम्ही संविधान मानतो. संघप्रमुखांनी मैदानात येऊन निवडणूक लढवावी. लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणूक लढवू नये, अशा शब्दात भीम आर्मी संघटनेचे प्रमुख अॅड. चंद्रशेखर आझाद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे. ते आज (22 फेब्रुवारी) नागपूरमधील भीम आर्मी कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
आपल्या भाषणात चंद्रशेखर आझाद म्हणाले, इंग्रजांसमोर माफी मागितली ते महापुरूष नाहीत. संघाचे लोक तिरंगा यात्रा काढतात, मग ते संघ मुख्यालयावर तिरंगा का लावत नाही? असाही प्रश्न आझाद यांनी उपस्थित केला. तसेच मोहन भागवत म्हणत होते की आरक्षणावर वादविवाद व्हायला हवा. त्यांनी यावं आणि आमच्याशी आरक्षणाबाबत वादविवाद करावा. देशात दलित, शीख इत्यादी अल्पसंख्याकांना वेगळं करण्याचं षडयंत्र सुरु आहे. सीएए-एनआरसी त्याचाच एक भाग आहे. कितीही लाठ्या मारल्या तरीही आम्ही देशाला वाचवण्यासाठी पुढे येणार आहोत, असंही चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले. दरम्यान, सुरुवातीला नागपूरमधील भीम आर्मीच्या कार्यकर्ता मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र, चंद्रशेखर आझाद यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर या मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती.