शेळगाव बंधार्‍याचे ‘हरीसागर’ नामकरण करा- डॉ. कुंदन फेगडे यांची मागणी

यावल प्रतिनिधी । शेळगाव बंधार्‍याचे दिवंगत लोकनेते हरीभाऊ जावळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरीसागर असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी येथील नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना देवेंद्र फडणवीस हे काल भालोद येथे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबाच्या सांत्वन करण्यासाठी आले होते. यावेळी यावलचे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा नगरसेवक डॉ कुंदन फेगडे यांनी त्यांच्याकडे एक निवेदन दिले. यात म्हटले आहे की, गेल्या सुमारे पंचवीस वर्ष लोकसभेत व राज्याच्या विधानसभेत सातत्याने आपल्या क्षेत्रातील शेतकर्‍यांचे प्रश्‍न असो किंवा जळगाव जिल्ह्याच्या विविध विकासाच्या कार्याचा मुद्दा असो किंवा समाजहित असो, या सर्व प्रश्‍नांना सडेतोड व अग्रभागी राहून भूमिका मांडणारे सर्वप्रिय असे लोकप्रिय लोकप्रतिनिधी हरीभाऊ माधव जावळे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्याही निधनाने आपण एक संयमी व सुसंस्कृत नेता गमावला असून त्यांनी सामाजिक व शेतकर्‍यासाठी केलेल्या कार्य हे सदैव आपल्या स्मरणात राहावे व त्याचे अनुकरण इतर लोकप्रतिनिधी करावे या दृष्टिकोनातून अशा या नेत्याला श्रद्धांजली म्हणून यावल तालुक्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प शेळगाव बॅरेज या जलाशयाचे हरीसागर असे नामकरण करावे. यासाठी फडणवीस यांनी विधानसभेत सदर मुद्दा मांडून याला संमत करून घ्यावे अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. याप्रसंगी विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी आमदार डॉ. गुरूमुख जगवाणी आदींची उपस्थिती होती.

Protected Content