जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सोशल मीडियावर महिलांबाबत व भारतीय जनता पक्षाविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह व बदनामीकारक टिप्पण्यांविरोधात भाजप जळगाव महानगरने आक्रमक भूमिका घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा नोंदवून कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी मंगळवार, ५ मे रोजी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. याप्रसंगी मह्नापौर दीपमाला काळे , महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष निलु परदेशी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, गायत्री राणे, महिला मोर्चा रेखा वर्मा, नंदीनी दर्जी, विशाल त्रिपाठी , राहुल वाघ, राजेश सोनवणे, जयेश भावसार, प्रकाश पंडीत, प्रदीप रोटे, मनोज भांडारकर, सचिन बाविस्कर आदी उपस्थित होते.
दि. ४ मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर जळगावात आयोजित करण्यात आलेल्या जल्लोष कार्यक्रमाची बातमी सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर एका व्यक्तीने फेसबुकवर अत्यंत अश्लील व आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या टिप्पण्यांमध्ये महिलांविषयी अवमानकारक भाषा वापरण्यात आल्याने समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपच्या निवेदनानुसार, संबंधित व्यक्तीने केवळ पक्षाची बदनामी केली नसून महिला कार्यकर्त्यांच्या चारित्र्यावरही शंका उपस्थित करणारे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारच्या भाषेचा वापर हा महिलांच्या सन्मानाला ठेच पोहोचवणारा असून समाजात वैमनस्य निर्माण करणारा गंभीर प्रकार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणात माहिती तंत्रज्ञान कायदा व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करून संबंधितावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
भाजप महिला मोर्चाच्या वतीने यासंदर्भात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून, प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



