जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नेरी ते पाळधी दरम्यान संभाजीनगर-जळगाव महामार्गालगत मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या फटाक्यांच्या कारखान्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अत्यंत ज्वलनशील व धोकादायक असलेल्या या कारखान्यांमुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, हे कारखाने तातडीने हलवावेत, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महामार्गालगत बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेले हे फटाका कारखाने सर्व सुरक्षा नियम धाब्यावर बसवून चालवले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारचे उद्योग मानवी वर्दळीपासून दूर, सुरक्षित ठिकाणी असणे आवश्यक असताना ते थेट महामार्गाच्या जवळ असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

अलीकडेच घडलेल्या एका आगीच्या घटनेने या धोक्याची गंभीरता अधिक स्पष्ट झाली आहे. या आगीत तीन बकऱ्यांचा मृत्यू झाला असून, सुदैवाने मानवी जीवितहानी टळली. मात्र, आग इतर कारखान्यांपर्यंत पसरली असती, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. त्यामुळे भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देत या फटाका कारखान्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची आणि सर्व सुरक्षा नियमांचे पालन करूनच परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच महामार्गालगत चालणारे हे धोकादायक कारखाने तातडीने बंद करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलून संभाव्य धोका टाळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



