शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात ; मोफत खते , बियाणे द्या-रक्षा खडसे

 

मुक्ताईनगर : प्रतिनिधी । दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध करावे तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावे असे आज  खासदार रक्षा  खडसे यांनी सांगितले

 

 

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणे जळगांव व बुलडाणा जिल्ह्यात हवामान अंदाज वेधशाळेने वर्तविल्याप्रमाणे कुठेही पाहिजे तसा पाऊस झालेला नसून, जून महिन्याच्या सुरवातीपासूनच परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून टाकली आहे. जुलै महिना उजाडला तरी सुद्धा अजून पावसाचे कुठल्याही प्रकारचे हवामान दिसत नाही. त्यामुळे पावसा अभावी नाईलाजास्तव शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना मोफत खते व बियाणे उपलब्ध होणे तसेच कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करावे असे निवेदन खासदार रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पत्राद्वारे केले आहे.

 

वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तविल्या प्रमाणे जून महिन्याच्या सुरवातीपासूनच जळगांव व बुलडाणा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करून टाकली होती. परंतु पाहिजे तसा पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडेच मोडले गेलेले असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आलेले आहे. आधीच कोरोना महामारीचा सामना करीत शेतकऱ्यांनी बँकेतुन कर्ज काढून मोठ्या कष्टाने पिकांची लागवड केली होती. परंतु पावसा अभावी शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेलेली आहे.

 

पावसा अभावी दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकार कडून मोफत खते व बियाणे उपलब्ध करावे तसेच सन २०१५ साली महाराष्ट्र शासनाकडून कुत्रिम पाऊसाचा प्रयोग करण्यात आला होता . तो बऱ्याच ठिकाणी यशस्वी सुद्धा झाला होता. त्याचप्रमाणे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न व्हावे असे खासदार रक्षाताई खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादाजी भुसे यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

 

Protected Content