शाळेची फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ओरीयन इंग्लिश मीडियम स्कूल स्टेट बोर्डच्या दोन विद्यार्थ्यांना शाळेची फी न भरल्यामुळे आठवीच्या वर्गात बसू दिले जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संबंधित शाळेवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी शनिवारी १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील कल्पेश सचिन ठाकूर, रितेश सचिन ठाकूर ही भावंड तर अकबर नजीर खान असे शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. कल्पेश व अकबर खान हे दोन्ही विद्यार्थी हे ओरियन इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये शिकत आहेत. त्यांची शाळेची फी बाकी असल्यामुळे दोघांना नापास करण्यात आले असा आरोप विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनी केला आहे. तर रितेश ठाकूर हा आठवीत गेला आहे, मात्र त्याची गेल्या वर्षीची फी बाकी असल्यामुळे त्याला पुढील वर्षात प्रवेश दिला नाही असे पालकांचे म्हणणे आहे. दरम्यान या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान होत असून संबंधित शाळेवर कारवाईची मागणी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे. न्याय मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षणाधिकारी एजाज शेख यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानुसार याची चौकशी करण्यात येवून संबंधित शाळेवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी एजाज शेख यांनी दिले.

Protected Content