जामनेर प्रतिनिधी । जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना लसीकरण सध्या सुरू आहे. लस पुरवठा हा टप्याटप्याने होत असून त्यानुसार लसीकरणाचा स्लॉट दिला जात आहे. मात्र,काही केंद्रांवर नागरिक लसीकरणासाठी गर्दी करीत असल्याने तेथील आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण, मानसिक व शारीरिक आरोग्यावर होतांना दिसून येत आहे.
तात्काळ लसीकरण मिळावे या प्रयत्नात बऱ्याच वेळा लस मिळण्यासाठी नागरिक अधिकारी किंवा लोक प्रतिनिधी यांना वारंवार फोन करीत असतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गैरसमज होऊन त्याचे रूपांतर वाद-विवादात व गोंधळ निर्माण होत आहे. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधर्य कमकुवत होवून त्यांच्या घरात सुद्धा परिवारातील सदस्या बरोबर चिडचिड वाढली आहे. आम्हाला वेळ देत नाही सतत फोनवर असतात अशी बऱ्याचदा कुटुंबातुन तक्रार असते. त्यामुळे आरोग्य यंत्रंणेतील अधिकारी व कर्मचारी आशा स्वयंसेविका यांचे कौटुंबिक आयुष्यात सुद्धा तणाव निर्माण होत आहेत.
लसीकरण करतांना ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे विशिष्ट वेळ लागतोच त्यातच रेंज किंवा लाईटचा प्रॉब्लेम आल्यास अडचण येते. तसेच कोरोना लसीकरणासाठी शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रांना साधा एक डेटा एन्ट्री ऑपरेटर सुद्धा नाही. हे काम शिपाई, आरोग्य सेवक यांच्याकडून करण्यात येत आहे. आरोग्य विभाग काही मोठ्या गावांना सुद्धा कोरोना लसीकरणाची सोय ग्रामपंचायतीच्या मदतीने उपलब्ध करून देत आहे. शिवाय आरोग्य विभागाचे नियमित कामकाज,नियमित लसीकरण, बुडीत मजुरी, जे.एस.वाय., प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, राष्ट्रीय कार्यक्रम तसेच कोरोना टेस्टिंग कॅम्पचे कामकाज सुद्धा करावे लागत आहे. रविवार किंवा इतर सुट्टीच्या दिवशी सुद्धा आरोग्य यंत्रणेला कामकाज करावे लागत आहे. त्यातच कोणत्याही प्रकारची सुट्टी मंजुर केली जात नाही. बऱ्याच अधिकारी व कर्मचारी तसेच आशा स्वयंसेविका यांना किंवा परिवारातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली. त्यावर मात करून काही दिवसातच ते पुन्हा कामावर हजर होऊन कामकाज करीत आहेत.
तरी ४५ वर्षे वरील नागरिकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रात लसीकरण करून घ्यावे. जेणेकरून स्थानिक पातळीवर विरोध होणार नाही व त्याचा दोन वर्षांपासून कोरोना योद्धे म्हणून काम करीत असलेल्या आरोग्य यंत्रणेवर ताण येणार नाही.
तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी काही केंद्रांवरच लसीकरण सुरू आहे. व हे लसीकरण केवळ ऑनलाईन नोंदणी करून आपल्याला ठिकाण व वेळ मिळल्यावरच करता येते. केवळ रजिस्ट्रेशन झाले म्हणजे लसीकरण होऊ शकत नाही त्यासाठी स्लॉट मिळणे आवश्यक असते. कोरोना लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्यास कोरोना संसर्ग झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. लसीकरण केल्यानंतर सुद्धा मास्क चा वापर, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी न करणे या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.