जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाने २७ जून, २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासून “शासन आपल्या दारी” या उपक्रमातंर्गत पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे केले होते.
या मेळाव्यासाठी एकूण १२ औद्योगिक / खाजगी आस्थापनानी १० वी पास/ १२ वी पास, आयटीआय, डिप्लोमाधारक, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या होत्या. रोजगार मेळाव्यासाठी एकूण 2241 रिक्तपदे कळविण्यात आली होती. मेळाव्यास 1335 उमेदवार उपस्थित होते. त्यापैकी 1074 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली असून 46 उमेदवारांची अंतिम निवड झाली आहेत. विविध आस्थापनांच्या स्टॉलवर भेटी देऊन मुलाखती दिलेल्या उमेदवारांची निवड प्रक्रियेची कार्यवाही उदयोजकांचे स्तरावर सुरु असल्याचे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.