शेतीसाठी सख्या भावावर प्राणघातक हल्ला : भावासह दोन मित्रांना जन्मठेपची शिक्षा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वडीलोपार्जीत शेत नावावर करुन देण्याच्या कारणावरुन भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांनी आरोपी संजय दत्तू डांबरे, उमेश मधुकर बागुल व विजय सुरसिंग राजपुत रा. मोहाडी या तिन्ही आरोपींना बुधवारी २८ जून रोजी दुपारी २ वाजता जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

 

पाचोरा तालुक्यातील लोहार दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार दिलीप दत्तू डांबरे यांनी वडीलांच्या मृत्यूपुर्वी त्यांच्याकडून ४ एकर शेती पैकी ३ एकर शेती विकत घेतली होती. तर उर्वरीत १ एकर शेत त्यांचा भाऊ संजय दत्तू डांबरे यांच्या नावावर करुन द्यावे. यासाठी संजय डांबरे यांनी त्यांचे शालक बापू मधुकर बागुल, उमेश मधुकर बागुल व मित्र  विजय सुरसिंग राजपूत रा. मोहाडी हे (एमएच १९ एएक्स ३७९५) क्रमांकाच्या ऍपरिक्षाने दिलीप डांबरे यांच्याशेतात अनाधिकाराने प्रवेश करीत शिवीगाळ करीत सुनिल डांबरे, बहीण रेखाबाई व वैशाली डांबरे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच मारहाण करुन चौघे जात असतांना दिलीप डांबरे हे तेथे आले असता, त्यांच्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.  याप्रकरणी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील लोहार दूरक्षेत्र पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास पुर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले. हा खटला सुरु असतांना बापू मधूकर बागुल यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांच्याविरुद्धचा खटला खारीज करण्यात आला होता.

 

हा खटला जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष महत्पुर्ण ठरली. तसेच सरकारपक्षाकडून साद करण्यात आलेले पुरावे व सरकारी वकीलांचा प्रभावी युक्तीवाद ग्राह्य धरुन संजय दत्तू डांबरे, उमेश मधुकर बागुल व विजय सुरसिंग राजपुत रा. मोहाडी या तिघांना दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील ऍड. निलेश चौधरी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी, विजय पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content