ब्रेकींग : दोन गावठी पिस्तूल व काडतूससह संशयिताला अटक

भुसावळ लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पांडुरंग टाकीजवळील दगडी पुलाजवळ दोन गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस आणि दुचाकीसह एका संशयित आरोपीला बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करत अटक केली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. देवानंद विकास कोळी वय २० रा. पाडळसा ता.यावल असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील पांडुरंग टाकीजवळील दगडी पुलाजवळ संशयित आरोपी देवानंद कोळी हा सोबत दोन गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस घेवून दुचाकीवर फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने बुधवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी पांडुरंग टॉकीज परिसरात कारवाई करत संशयित आरोपी देवानंद कोळी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस आणि दुचाकी असा एकुण १ लाख १५ हजारांची मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन, पोलीस उपनिरीक्षक राजीव सांगळे, पोलीस नाईक निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार यांनी केली आहे.

Protected Content