शासन “आधारवड” म्हणून अनाथ बालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – पालकमंत्री

जळगाव प्रतिनिधी । कोरोना कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या 20 तसेच एका पालकाचा मृत्यू झालेल्या 359 अनाथ बालकांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून अनाथ मुलांच्या मागे शासन “आधारवड” म्हणून खंबीरपणे उभे आहे तसेच  “मिशन वात्सल्य अंतर्गत” अनाथमुले व विधवा महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असून शासकीय नोकरी कामी १ % आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांनी केले. ते अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लाखाचे  मुदतठेव प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमा प्रसंगी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते . यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आ.चंद्रकांत पाटील, आ.संजय सावकारे उपस्थित होते.

याप्रसंगी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते कोरोना मुळे  दोन्ही  पालक गमावलेल्या 20 अनाथ बालकांना प्रत्येकी 5 लाखाचे मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आले. या मुलांना दरमहा 1100 रुपये मिळणार असून त्यांना शासकीय नोकरी कामी 1 % आरक्षण मिळणार आहे. सज्ञान झाल्यावर सदर मुला मुलींना व्याजासह रक्कम मिळणार असल्याने त्यांना शासनातर्फे मोठा दिलासा मिळाला आहे.

विधवा महिलांना मिळणार लाभ

कोविड काळामध्ये  जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तसेच उपेक्षित वंचित घटकातील 337 महिलांना अकाली वैधव्य आले. त्यामुळे त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा काळात या महिलांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी ‘मिशन वात्सल्य’ मोहिमेच्या अंतर्गत मदत केली जात आहे. सदर 337 महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा किंवा श्रावणबाळ योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने अनाथ मुले व विधवा महिलांसाठी कार्य तत्पर राहण्याच्या सूचनाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत

या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार चंद्रकांत पाटील, संजय सावकारे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, ऍड प्रदीप पाटील, आय डी बी आय चे व्यवस्थापक विशाल भालेराव, महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी, पर्यवेक्षाधीन अधिकारी संजय पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश मुक्कावार यांच्यासह महिला बाल विकासाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महिला बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी केले. आभार योगेश मुक्कावार यांनी मानले.

 

Protected Content