नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेत महिला खासदारांवर हल्ला झाल्याचं सांगताना आपण आपल्या ५५ वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असं कधीचं पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे .
संसदेचे पावसाळी अधिवेशन नियोजित कालावधीच्या दोन दिवस आधीच गुंडाळण्यात आले. लोकसभा आणि राज्यसभा बुधवारी संस्थगित करण्यात आली. विरोधकांच्या गोंधळामुळे राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले. पेगॅसस आणि तीन कृषी कायद्यांसहित वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन विरोधकांनी सभागृहात गदारोळ घालत सरकारला धारेवर धरलं. राज्यसभेत बुधवारी पेगॅसस तसंच १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरदार गोंधळ झाला.
काँग्रेस, राष्ट्रवादीसह विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी वेलमध्ये उतरुन आंदोलन करणाऱ्या महिला खासदारांनी निषेध व्यक्त करत कागद फाडून भिरकावले. मार्शल्सकडून गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर सरकारने विरोधकांनी सभागृहात उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.
“संसदेतील माझ्या ५५ वर्षांच्या करिअरमध्ये (राज्यसभा) महिला खासदारांवर ज्याप्रकारे हल्ला करण्यात आला तसं कधीच पाहिलेलं नाही. सभागृहात बाहेरुन ४० पुरुष आणि महिलांना आणण्यात आलं. हे वेदनादायी असून लोकशाहीवर हल्ला आहे. सभागहात हे योग्य झालं नाही,” असं शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान दुसरीकडे काँग्रेसच्या महिला खासदारांनी सरकार आणि मार्शल्सवर गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेता मल्लिकार्जून खरगे यांनी विरोध सुरु असताना तिथे उपस्थित काही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी महिला सदस्यांसोबत धक्काबुक्की करत अपमान केला असा आरोप केला आहे. विरोधी पक्षातील सदस्य विरोध प्रदर्शन करण्यासाठी आसनाजवळ जातात तेव्हा त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून घेरलं जातं असंही ते म्हणाले आहेत. हा संसदेचा आणि लोकशाहीचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली आहे.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे सर्व सत्यापासून फार दूर असल्याचं ते म्हणाले आहेत. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना ते म्हणाले आहेत की, “विरोधी सदस्यांनी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली”. सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध केलं जावं अशी सभापतींकडे विनंती केल्याचं सांगितलं आहे.
पियूष गोयल यांनी गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर कारवाईची मागणी केली आहे. महिला कर्मचाऱ्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष समिती स्थापन करुन याची चौकशी झाली पाहिजे असंही ते म्हणाले आहेत.