नेत्यांचे अनाठायी लाड आवरा ; डॉक्टरांची पंतप्रधानांकडे तक्रार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं पहिल्या फळीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर पुन्हा ताण आहे. अशा संकटकाळात राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना व्हीआयपी कल्चरचा प्रत्यय येत आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने पंतप्रधान मोदी यांच्याकडेच तक्रार केली आहे.

 

या संघटनेने  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात डॉक्टरांनी राजकीय नेत्यांच्या व्हीआयपी कल्चरची तक्रार केली आहे.  शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांना राजकारण्यांकडून चाचण्या आणि उपचारासाठी थेट घरी बोलावून घेतलं जात आहे, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

 

पहिल्या फळीत सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांना संसर्ग झाला, तर अल्पशी सुविधा मिळते. दुसरीकडे रॅली आयोजित करणाऱ्या आणि विषाणूचा प्रसार करणाऱ्या  नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वरचा प्राधान्यक्रम दिला जातो. अनेक सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र व्हीआयपी काऊंटर्स आहेत. तिथे फक्त राजकीय नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्याच कोविड चाचण्या केल्या जातात. पण, अशा ठिकाणी डॉक्टरांसाठी स्वतंत्र काऊंटर्स नाहीत, अशी तक्रार पत्रातून करण्यात आली आहे.

 

वैद्यकीय अधीक्षकांसाठी कोणतेही आदेश नसताना राजकीय नेत्यांकडून डॉक्टरांना चाचण्या आणि उपचारासाठी त्यांच्या घरी बोलावलं जाते. डॉक्टरर्स स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. मात्र त्या मोबदल्यात त्यांना काय मिळत आहे, चाचण्यांसाठी लांब रांगामध्ये उभं राहावं लागतंय. कोरोना झाल्यानंतर त्यांना बेड आणि आयसीयूही उपलब्ध होत नाही. अशी तक्रार फेडरेशन ऑफ ऑल मेडिकल असोसिएशनने केली असून, या पत्रावर संघटनेचे अध्यक्ष डॉ. राकेश बागडी, उपाध्यक्ष डॉ. अमरनाथ यादव आणि महासचिव डॉ. सुब्रांकर दत्ता यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content