आता संजय राठोड यांच्या आमदारकीवरही भाजपचे बोट !

 

मुंबई: वृत्तसंस्था ।  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. पण त्यांच्या आमदारकीचं काय? शिवसेना त्यांच्या आमदारकीचाही राजीनामा घेणार का? असा सवाल भाजपने केला आहे.

 

भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरल्याने पूजा चव्हाण प्रकरण राठोड आणि शिवसेनेला आणखीनच भोवणार असल्याचं दिसत आहे.

 

भाजपने त्यांच्या ट्विटर हँडलवरून संजय राठोड यांच्याविरोधात कँम्पेन सुरू केलं आहे. या पोस्टमध्ये भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राठोड यांचे फोटो छापले आहेत. त्यावर पूजा चव्हाण प्रकरणी भाजपने मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारून या प्रकरणातील मुख्यमंत्र्यांच्या बेपर्वाईवरच बोट ठेवलं आहे. बराच गदारोळ माजल्यानंतर शिवसेनेने संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. पण आता आमदारकीचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का?, पूजा चव्हाण यांची हत्या, आत्महत्या की घातपात याचा तपास कधी पूर्ण होणार? सत्य जनतेला कधी कळणार?, असा सवाल भाजपने केला आहे.

 

 

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन पूजा चव्हाण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचं म्हटलं आहे. चौकशीचे आदेश दिले तर इतके दिवस उलटूनही या प्रकरणाची साधी फिर्याद दाखल का करण्यात आली नाही? फिर्याद दाखल न करणे हा राठोडांना वाचवण्याचा प्रयत्न होता का? असा सवालही भाजपने केला आहे.

 

राठोड यांनी राजीनामा दिला खरा पण आता ठाकरे सरकार त्यांच्यावर कारवाई करणार का? ठाकरे सरकार त्यांची चौकशी कधी करणार? आणि चौकशीत राठोड हे दोषी आढळले तर त्यांच्यावर निष्पक्षपातीपणाने कारवाई होणार का? हे खरे प्रश्न आहेत, असंही भाजपने म्हटलं आहे.

 

राजीनामा दिल्यानंतर संजय राठोड हे थेट यवतमाळला जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण राठोड हे यवतमाळला जाणार नसून ते उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार म्हणून भाग घेणार असल्याचं राठोड यांनीच सांगितलं. शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांना भेटून बाहेर पडल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला मोकळं सोडा. आता झाला ना राजीनामा. मी अधिवेशनातच राहणार आहे, असंही ते म्हणाले

Protected Content