आणखी एका सेना नेत्याला किरीट सोमय्या अडकवणार ?

 

मुंबई : वृत्तसंस्था । भाजप नेते किरीट सोमय्या  आज पुन्हा एकदा ईडी कार्यालयात  गेले त्यांनी प्रताप सरनाईक यांच्याबद्दल महत्वाची माहिती दिल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेच्या अजून एका नेत्याला एक्स्पोज करणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला आहे

 

प्रताप सरनाईक यांच्या विहंग सोसायटी घोटाळ्याची तक्रार सोमय्या यांनी ईडीकडे केली आहे. सरनाईक यांच्या नावावर ११२ सातबारे असल्याची माहिती सोमय्या यांनी ईडीला दिली होती. दरम्यान, प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.

 

सोमय्या यांनी १६ डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.

 

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं ट्विटही केलं आहे. सोमय्या यांच्या या ट्विटने एकच खळबळ उडाली असून भाजपच्या रडारवरील हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे. संजय राठोड गेले. आता दोन दिवसात मी पुराव्यांसह शिवसेनेच्या आणखी एका नेत्याचा घोटाळा उघड करणार आहे, असं ट्विट सोमय्या यांनी केलं आहे.

 

 

सोमय्या यांनी या ट्विटमध्ये कोणत्या शिवसेना नेत्याचा पर्दाफाश करणार त्याचा उल्लेख केलेला नाही. शिवसेनेचा हा नेता मुंबई, ठाण्यातील आहे की इतर कोणत्या जिल्ह्यातील आहे याचीही वाच्यता केलेली नाही. सोमय्या यांच्या रडारवर असलेला हा नेता कोण? असा सवाल केला जात आहे. सोमय्या यांनी हे ट्विट करताना त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टॅग केलं आहे. त्यामुळे दोन दिवसात सोमय्या कोणत्या नेत्याचा पर्दाफाश करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Protected Content