खडसेंच्या ‘एंट्री’ने कॉंग्रेसच्या गोटात टेन्शन !

जळगाव (प्रतिनिधी) लोकसभेच्या ऐनमौक्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जिल्ह्यातील ‘एंट्री’ राजकारणाला आणखी एक कलाटणी देणारी ठरेल,असा अंदाज आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर खडसे शनिवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. खडसे जिल्ह्यात परतल्यामुळे राजकीयदृष्ट्या रावेर लोकसभा मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार डॉं.उल्हास पाटील यांचे टेंशन तर भाजप उमेदवार रक्षाताई खडसे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. एकंदरीत खडसे यांची रावेर मतदार संघावरील पकड लक्षात घेता,ते अनेक घडामोडी घडवून आणतील आणि आपल्या स्नुषा यांना सहज विजय मिळवून देतील, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

 

काही दिवसांपूर्वी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईत होते. त्यामुळे खडसे यांनी मुक्ताईनगरमधील एका सभेला मोबाईलच्या माध्यमातून संबोधित केले होते. यावेळी रक्षाताई खडसे यांना सभेतच अश्रू अनावर झाले होते. परंतु आता खडसे परतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोश निर्माण झाला असून रावेर लोकसभा मतदार संघात भाजपमय वातावरण झाले आहे. युतीच्या उमेदवार रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे यांनी संपूर्ण मतदारसंघ गेल्या काही महिन्यांपासून पिंजून काढला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खडसे यांनी प्रतिष्ठेची लढाई करत रक्षाताई यांना थेट लोकसभेवर पाठवले होते. गतवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांचा सव्वा तीन लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर खडसे यांची रावेर मतदार संघातील एंट्री राजकीय उलथापालथीचे कारण बनू शकते, असे मत जाणकारांचे मत आहे.

 

रावेर मतदारसंघातील पक्षीय बलाबल पाहता शहरी व ग्रामीण भागात देखील भाजपचीच पकड आहे. हा लोकसभा मतदार संघ हा अनेक पंचवार्षिक पासून भाजप पर्यायी एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. या मतदार संघात येणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदार संघावर खडसेंची जबरदस्त पकड आहे. अगदी नगरध्यक्ष,नगरसेवक तसेच जिल्हा परिषद,पंचायत समितीमधील निवडून आलेले खडसे समर्थ सदस्यांची संख्या भली मोठी आहे. तर या मतदार संघात लेवा समाज बहुसंख्य असल्यामुळे या मतदार संघात कायमच लेवा उमेदवार विजय मिळवीत आलेला आहे. एकनाथराव खडसे यांचे लेवा समाजात मोठे वजन आहे. खडसे यांच्यावर अन्याय झाला होता,त्यावेळी लेवासमाजाचे कुटुंबनायक रमेशदादा पाटील यांनी अगदी जाहीररित्या खडसे यांची बाजू घेतली होती. थोडक्यात खडसे परतल्यामुळे कॉंग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरलेले असून खडसे यांची सक्रियता कॉंग्रेसचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांची डोकेदुखी वाढवणारी आहे.

Add Comment

Protected Content