काँग्रेसबद्दल अपप्रचार करून मोदी निवडून आले — पटोले

 

मुंबई : वृत्तसंस्था । नाना पटोले यांनी राजीव गांधींनंतर संघटनात्मक पातळीवर काँग्रेस पक्ष कमी पडल्याचं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसचा अपप्रचार केल्यामुळे निवडून आल्याचा टोलाही त्यांनी लगावला

 

काँग्रेसच्या नेतृत्वासंदर्भात मागील बऱ्याच काळापासून सातत्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. काँग्रेसमध्येच नेतृत्वावरुन दोन गट पडल्याच्या बातम्याही अनेकदा समोर आल्या आहेत. असं असतानाच आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस नेतृत्वासंदर्भात महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

 

एका  कार्यक्रमामध्ये नाना पटोले यांनी राज्यातील राजकारणापासून देशपातळीवरील राजकारणासंदर्भात भाष्य केलं. यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल बोलताना, “राजीव गांधींनंतर संघटनात्मक पातळीवर आम्ही कमी पडलो. काँग्रेसकडे सध्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नेतृत्व असून त्यांनी जीएसटी, नोटबंदी आणि कोरोना काळातील संकटावर आधीच इशारा दिला होता,” असं मत व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना पटोले यांनी, “(काँग्रेसच्या कालावधीमध्ये झालेल्या) देशाच्या विकासाचा अपप्रचार करण्यात आला. या अपप्रचाराला लोकं बळी पडले आणि त्यामुळेच देशाला चुकीचे नेतृत्व मिळालं आहे.  त्याचा परिणाम आता लोकांना भोगावा लागतोय,” असंही पटोले यांनी म्हटलं आहे.

 

नाना पटोले यांनी काँग्रेसची भविष्यातील वाटचालीबरोबरच यापूर्वी पक्षाने केलेल्या कामगिरीबद्दल भाष्य केलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण राज्याच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचं पटोले म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी सध्या देशासमोर असणाऱ्या समस्यांबद्दल भाष्य करत बेरोजगारी ही समाजाला लागलेली किड असल्याचं म्हटलं आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी शेतीवर आधारित उद्योग उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. असं असलं तरी केंद्र सरकारची शेतीसंदर्भातील चुकीची धोरणं शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला बाधा घालत असल्याची टीका नाना पटोलेंनी केली.

 

पटोले यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही आठवड्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य व्यवस्थेसंदर्भात भाष्य करताना लिहिलेल्या एका लेखाचा संदर्भ देत, “नेहरु, गांधी परिवार नसता तर आज अनेकजण रस्त्यावर मेले असते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील लोकांना मोफत आरोग्य व्यवस्था निर्माण व्हावी अशी काँग्रेसची विचारसणी होती. एम्स, इतर रुग्णालये यासारख्या गोष्टी याच विचारसणीमधून निर्माण केल्या. मात्र आता उभारलेल्या व्यवस्था कमी पडतायत,” असं पटोले म्हणाले.

 

आरोग्य व्यवस्था अजून मजबूत आणि सर्वांनाच मोफत व चांगला उपचार मिळावा अशी आमची विचारसणी आहे, असंही पटोले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात काम करण्याचा आमचा विचार आहे. इंग्रज देश लुटून गेले तर आम्ही रडत बसलो नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणांच्या आधारे काम करताना श्रीमंतांकडून कर घेऊन गरिबांचाही विकास करण्याचं धोरण काँग्रेसने स्वीकारलं, असं पटोले म्हणाले.

 

राज्याला एका वाईट परिस्थितीमधून वर आणण्याचं काम काँग्रेसने केल्याचं नाना पटोले म्हणाले. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते मूलभूत सुविधांपर्यंत सर्वच गोष्टींची उभारणी करुन राज्याला दिशा देण्याचं आणि देशाचं कॅपिटल राज्य बनवण्याचं काम काँग्रेसने केलं असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या विचारांनी महाराष्ट्र राज्य उभं राहिलं आहे, असंही नाना पटोलेंनी सांगितलं. देशाच्या एकत्रिकरणासाठी, लोकशाही टिकवण्यामध्ये काँग्रेसची फार महत्वाची भूमिका राहिली आहे. देशातल्या लोकांना लोकशाहीमध्ये सामिल करुन घेण्यामध्ये आणि लोकशाहीच्या बळकटीकरणामध्ये काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावल्याचंही पटोले यांनी सांगितलं.

 

Protected Content