यावल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत ३१ विषय मंजूर

yawal n.p.news

यावल, प्रतिनिधी | येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगरपरिषदेच्या सभागृहात पार पडली. त्यात नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विस्तारित भागातील नवीन पिण्याच्या टाकीवरून पाईपलाईन टाकण्याबाबत १४ व्या वित्त आयोग या निधीतून ३ कोटी ६५ लक्ष रुपये खर्च करण्यास सभेने मान्यता देण्यात आली.

 

नगर परिषद संचलीतव्दारे सानेगुरुजी उच्च माध्यमिक विद्यालयासाठी नवीन बेंचेस खरेदी करण्याच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यालयात नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी देखील वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. महाजन गल्लीमधील विविध रस्त्यांच्या काँक्रीट कामांना मंजुरी देण्यात आली असून काजीपुरा भागात मुस्लिम बांधवांसाठी समाज मंदिराच्या दुसरा मजला बांधणे बाबतच्या कामास देखील मंजुरी देण्यात आली आहे. सभेत नगरसेवक शेख असलम नगरसेविका रेखा चौधरी नगरसेवक सय्यद युनूस यांनी स्वच्छतेबाबत प्रश्न उपस्थित करून शहरात नियमित स्वच्छता होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले .

उपनगराध्यक्ष तथा प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते ऐनवेळी सभेत अनुपस्थित राहील्याने नगरसेवक शेख असलम यांनी नगरपालिका अधिनियम १९६५ च्या सभा कामकाज नियमानुसार नगराध्यक्ष सभेस उपस्थित नसल्यास त्यांच्याऐवजी उपाध्यक्ष यांनी सभेचे कामकाज चालवावे. ही दोन्ही पदे कोलते यांचेकडेच असल्याने उपस्थित सदस्यांपैकी एका सदस्यास सभाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात यावे. असा नियम असल्याने सभेच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांना नेमण्याची सूचना मांडल्याने नगरसेविका देवयानी महाजन यांनी अनुमोदन दिले व ते सभागृहाने सवार्नुमते ठराव केल्याने अतुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सभा कामकाजास सुरुवात करण्यात आली.

Protected Content