मोदींना पुन्हा आवाहन आहे की , नवे कृषी कायदे मागे घ्या — राहुल गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये महात्मा गांधी यांचा “विनम्रतेने तुम्ही जग हलवू शकता”, हा सुविचार सांगितला आहे. तसेच, “पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन आहे की, तत्काळ कृषी विरोधी कायदे मागे घेण्यात यावेत.” असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चात घडलेल्या हिंसाचाराने, शेतकरी आंदोलनास गालबोट तर लागलचं, शिवाय लाल किल्ल्यावर आंदोलकांनी चढाई करून, अन्य झेंडे फडकवल्याचे पाहून अवघा देश थक्क झाला. या हिंसाचारात आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसह लाल किल्ल्यातही तोडफोड केली गेली. तर, तब्बल ३०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी या हिंसाचाराबद्दल २२ गुन्हे नोंदवले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देखील ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

 

या अगोदर काल दिल्लीत हिंसाचार घडत असताना देखील राहुल गांधी यांनी ट्विट करत, शेतकऱ्यांना शांततेचं आवाहन केलं होतं.“हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषी विरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.” असं राहुल गांधी म्हणाले होते.

काल ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर निशाण ए साहिब ध्वज व शेतकरी संघटनांचे झेंडे फडकवले होते. शेतकऱ्यांना चिथवण्यामागे कोण आहे याच शोध घेतला जात असताना, दीप सिद्धू व लक्खा सिंह सिधाना ही दोन नावं समोर आलेली आहेत.

Protected Content