मुंबई : वृत्तसंस्था । मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास कॅम्पस बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा विद्यार्थी असल्याचं निष्पन्न झालं आहे.
प्रलंबित निकालामुळे मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थ्यानेच शिवीगाळ करणारा ईमेल पाठवला होता. सायबर पोलिसांनी त्याचा माग काढल्यानंतर वॉर्निंग आणि नोटीस देत त्याला सोडून देण्यात आले.
नऊ आणि दहा जुलैला आलेल्या या ईमेल प्रकरणी मुंबईतील बीकेसी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला होता. कॉमर्सच्या विद्यार्थ्याने सायबर कॅफेमधून हा धमकीचा ईमेल पाठवला होता. तपासात हा मेल खोट्या तपशिलांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ईमेल आयडीवरुन पाठवलेला बनावट मेल असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला ताब्यात घेतले. मात्र तो विद्यार्थी असून मानसिक तणावातून त्याने हे कृत्य केल्याने नोटीस देऊन त्याला सोडून देण्यात आले.
कोरोना काळात अनेक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. अनेक जण मानसिक तणावात असून फ्रस्ट्रेशनमधून खोटे ईमेल किंवा फोन पाठवत असल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम घेण्यात आली, मात्र ती अफवा असल्याचं स्पष्ट झालं.
मुंबई विद्यापीठाने आपल्या सर्व शैक्षणिक विभागांतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार आहेत. याची 12 ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसापासूनच मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी या प्रवेशासाठी प्रतिसाद दिला आहे. अंतिम गुणवत्ता यादी 2 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार आहे.