नाशिक वृत्तसंस्था । नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या ३३४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ५ दिवसात १५२ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
मालेगाव शहरात ८ एप्रिलपर्यत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. मात्र त्यानंतर ८ एप्रिलला ५ रुग्ण आढळले आहेत. त्याच दिवशी एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मालेगावात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले. सद्यस्थितीत मालेगावात ३३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २८ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
सुरुवातीला शहराच्या पूर्व भागात वाढत असलेल्या कोरोनाने पश्चिम भागात ही आपले पाय पसरवण्यात सुरुवात केली. शहरातील ५५ भाग हे कंटेन्मेट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. या भागातील नागरिकांना बाहेर जाण्यास तर बाहेरील व्यक्तींना आत जाण्यास मनाई करण्यात आले आहे.
मालेगावमधील हॉटस्पॉट
मोमीनपुरा, कमालपुरा, नयापुरा, नूरबाग, इस्लामपुरा, आपण सुपर मार्केट एरिया, संगमेश्वर भाग, सिद्धार्थ नगर, गुलाब पार्क हा भाग हॉटस्पॉट ठरला आहे.