महत्वाच्या टेकड्या भारताने आधीच ताब्यात घेतल्याने चीनशी युद्ध टळले

 

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । महत्वाच्या टेकड्या भारताने आधीच ताब्यात घेतल्याने चीनशी युद्ध टळले  असा खुलासा नुकताच लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी  यांनी केला

 

पूर्व लडाख सीमेवर मागच्या नऊ महिन्यांपासून भारत-चीनमध्ये प्रचंड तणाव होता. मुख्य संघर्षाचे कारण असलेल्या पँगाँग टीएसओ सरोवर क्षेत्रातून दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेतल्यामुळे आता परिस्थिती हळूहळू सामान्य होत आहे. पण एकवेळ या भागात युद्ध होईल, अशी स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. सीमेवर त्यावेळी निर्माण झालेल्या या नाजूक स्थितीबद्दल उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी यांनी अलीकडेच पत्रकारांशी बोलताना खुलासा केला.

 

मागच्यावर्षी ऑगस्ट अखेरीस भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये युद्धाचा भडका उडेल, अशी स्थिती होती. “दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठं युद्ध होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, पण सुदैवाने ते टळलं” असं लेफ्टनंट जनरल वाय.के.जोशी म्हणाले.

 

“२९-३० ऑगस्टच्या रात्री भारतीय सैन्याने पँगाँग टीएसओच्या दक्षिणेकडील कैलाश रेंजमध्ये टेकडया ताब्यात घेऊन चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला धक्का दिला. भारताने आपले रणगाडेही तिथपर्यंत पोहोचवले. यामुळे सशस्त्र युद्ध होऊ शकलं असतं. पीएलएने सुद्धा त्या उंचावरील भागात रणगाडे नेण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैन्य वरती रणगाडे आणि रॉकेट लॉचर्ससह बसलं होतं. दुर्बिणीच्या रेंजमधून त्यांना पाहिल्यानंतर ट्रिगर दाबणं सर्वात सोपी गोष्ट होती. पण आम्ही संयम दाखवला” असे जोशी म्हणाले. रणनितीक दृष्टीने महत्त्वाचा भाग त्या रात्री भारतीय सैन्याने ताब्यात घेतल्यामुळे चर्चेच्या टेबलावर भारताचे पारडे जड झाले. ‘ते आमच्यासाठी खूप तणावाचे आणि आव्हानात्मक क्षण होते’ असे जोशी म्हणाले.

 

गलवान खोऱ्यातील चकमकीबद्दल बोलताना ते म्हणाले की, “भारताच्या टेहळणी चौक्यांनी मोठया प्रमाणावर पीएलएच्या सैनिकांना स्ट्रेचरवरुन नेताना पाहिले होते. ६० पेक्षा जास्त सैनिक होते. पण त्यांची नेमकी स्थिती कशी होती? चिंताजनक होती किंवा काय, हे ठामपणे सांगता येणार नाही.”

Protected Content