पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवटीचे संकेत

नवी दिल्ली । पश्‍चिम बंगालमध्ये गुरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकी नंतर राज्यपालांनी अहवाल पाठवला असून यामुळे आता या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता बळावली आहे.

जे. पी. नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या दगडफेकी नंतर केंद्र सरकारने राज्यपाल जगदीप धनखड़ यांच्याकडून अहवाल मागविला होता. धनखड यांचा अहवाल मिळताच केंद्राने तातडीने बंगालचे डीजीपी आणि मुख्य सचिवांना दिल्लीला बोलवून घेतले असून पश्‍चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे संकेत राज्यपालांनी दिले आहेत.

याबाबत राज्यपाल धनखड म्हणाले की, जे काही झाले ती एक चिंताजनक अशी स्थिती होती. ती एक लोकशाही व्यवस्थेला धक्का पोहचविणारी घटना होती. तुम्ही यावर विश्‍वास ठेवणार नाही, सकाळी जेव्हा मला भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या दौर्‍याबाबत माहीत पडले तेव्हा मी राज्याच्या डीजीपींना सकाळी आठ वाजता सावध केले होते. याव्यतिरिक्त मी राज्याच्या मुख्य सचिवांशी देखील संपर्क साधला होता. राज्याच्या प्रशासनाने व्यवस्थित काम केले नाही, असे ते म्हणाले. ममता बॅनर्जी यांना राज्यघटनेचे पालन करावेच लागेल. जेव्हा त्या राज्यघटनेचे पालन करत नाहीत तेव्हा मला यात पडावे लागते. लोकशाही निशाण्यावर असताना मी राजभवनात रबर स्टॅम्प बनून राहू शकणार नाही असं देखील राज्यपालांनी म्हटलं आहे.

राज्यपाल धनखड यांनी ममता यांना इशारा देताना ममता यांनी संविधानाचे पालन करावे, जर तसे झाले नाही तर माझा रोल सुरु होणार आहे, असा इशारा धनखड यांनी दिला आहे. यामुळे आता पश्‍चीम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Protected Content