भाजपला सावरकरांचा आलेला पुळका खोटा-शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । स्वातंत्र्यवीर सावकरांची ढाल पुढे करून भाजप नवराष्ट्रवादाचे राजकरण करत असल्याचा आरोप करून भाजपला सावरकांचा आलेला पुळका खोटा असल्याचा हल्लाबोल आज शिवसेनेने केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील आजच्या अग्रलेखातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, वीर सावरकरांच्या विषयावर सरकारची कोंडी करू, असे भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील मंडळींनी जाहीर केले. याचा अर्थ स्पष्ट आहे. सावरकर हा भाजपसाठी आदर किंवा श्रद्धेचा विषय राहिला नसून फक्त राजकारणाचा विषय बनला आहे. सावरकरांच्या स्मृतिदिनी त्यांचे पुण्यस्मरण सगळयांनीच केले. त्यांच्या स्मरणाचे ढोंग आज जे करीत आहेत त्यांना सावरकर खरेच कळले काय? प्रजासत्ताक दिनीही मोदी सरकारने वीर सावरकरांना ङ्गभारतरत्नफ का जाहीर केला नाही? यावर महाराष्ट्रातील हे नव सावरकरप्रेमी काही प्रकाश टाकणार आहेत काय? महाराष्ट्राच्या विधानसभेने ठराव करावा वगैरे मागणी ठीक आहे, पण फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी वीर सावरकरांना भारतरत्न देण्याविषयी दोन पत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवली होती. त्याचे पुढे काय झाले? त्या पत्रांची दखल केंद्राने घेतली नाही हा महाराष्ट्राचा आणि वीर सावरकरांचाही अपमान असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, वीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान होतेच, पण स्वातंत्र्य चळवळीत भाजप किंवा तेव्हाचा संघ परिवार कोठे होता? १९४७ साली स्वातंत्र्यदिनही संघाने मानला नाही व राष्ट्रध्वज तिरंगा संघ मुख्यालयावर फडकवला नाही. काही ठिकाणी तिरंग्याचा घोर अपमान करण्याचा प्रयत्न झाला हे सर्व इतिहासात नोंदले गेले आहे. भगवा ध्वज हे शिवसेनेचेही प्रतीक आहे, पण भगव्याच्या बरोबरीने तिरंगाही फडकवला जातो हा आपला राष्ट्रवाद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ढाल करून भाजप हे नवराष्ट्रवादाचे राजकारण खेळते आहे. त्यामुळे शिवसेनेसमोर पेच निर्माण होईल असे त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लाथ बसेल. भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा आहे. वीर सावरकर हे भाषाप्रभूसुद्धा होते. मराठी भाषेत शुद्धीचे प्रयोग त्यांनी केले. आजच्या मराठी भाषादिनी वीर सावरकरांचे स्मरण करूया असे यात म्हटले आहे.

Protected Content