वेळेवर बिल भरा , महावितरणला खासगीकरणापासून वाचवा ; कर्मचाऱ्यांचे आवाहन

 

पुणे : वृत्तसंस्था । आता पिंपरी-चिंचवड शहरात महावितरण कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना वीज बिल भरा आणि खासगीकरणापासून महावितरणास वाचवा, असं ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून गाणी म्हणून आवाहन केलं जात आहे.

राज्यात वाढीव वीज बिलांचा मुद्दा  व महावितरणच्या वीज तोडणी मोहिमेवरून मागील काही दिवसांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला होता. यावरून विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक होत राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली होती. 

महावितरण कर्मचाऱ्यांचा हा ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तर, खासगीकरण झाल्यास १ रुपयाच्या ऐवजी तुम्हाला ५ रुपये द्यावे लागतील, असं यावेळी सांगण्यात येत आहे आणि वीज बिल भरण्याची विनंती केली जात आहे. वीज बिलाबाबत काही शंका असल्यास नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयास भेट द्यावी, असं देखील आवाहन केलं जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना भरमसाट वीज बिल आल्याचे दिसून आले आहे. परिणामी, बिलाची रक्कम भरण्यास ग्राहकांकडून नकार दर्शवला जात आहे. तर, महावितरणने वीज बिल वसुलीसाठी बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली होती. याचे पडसाद विधासभेमध्ये उमटल्याचे आणि राजकारण रंगल्याच सर्वांनीच पाहिलं होतं.

याच अनुषंगाने ग्राहकांनी थकीत वीज बिल भरले नाही तर महावितरणचे खासगीकरण होईल आणि ते सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे नाही, असं महावितरणच्या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून सांगाव लागत आहे. हे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. मात्र, याच गर्दीतून कितीजण वीज बिल थकबाकीदार बिल भरणार हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे.

Protected Content