भाजपाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधिशांची केंद्राकडून तडकाफडकी बदली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उच्च न्यायालयाने कपिल मिश्राच नव्हे तर, केंद्रीय राज्यमंत्री अनुराग ठाकूर, परवेश वर्मा आणि अभय वर्मा यांच्या प्रक्षोभक विधानांची चित्रफीत बघितल्यानंतर लोकांना भडकवणाऱ्यांविरोधात तातडीने गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक शब्दात दिल्ली पोलिसांना फटकारणारे न्या. एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी पोलिसांना फटकारे लगावणारे दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कॉलिजीयमने १२ फेब्रुवारीला झालेल्या आपल्या बैठकीत त्यांच्या बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे. यासंदर्भातील आदेश बुधवारी रात्री उशीरा जारी करण्यात आले. हे वृत्त समोर आल्यानंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, जाळपोळ, मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची तत्परता दाखवता, मग प्रक्षोभक विधाने केल्याबद्दल का कारवाई केली नाही? आम्ही १० डिसेंबरपासून अशा विधानांवर नजर ठेवून आहोत. गुन्हा घडला आहे हे देखील तुम्ही मान्य करत नाही का? असे सवाल करत तातडीने गुन्हे नोंदवण्याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश न्या. मुरलीधर यांनी दिले होते.

Protected Content